Ashvini Bhave : ९० च्या दशकात मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अश्विनी भावेंना ओळखलं जातं. त्यांनी आजवर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘हीना’, ‘वजीर’, ‘धडाकेबाज’ अशा असंख्य लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अश्विनी भावे आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकेत राहतात. त्यांच्या अमेरिकेतील घरी अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांचा उत्तम पाहुणचार केल्याचं पाहायला मिळालं आहे. यासह त्या सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

गेल्या काही वर्षांत असंख्य मराठी लोक कामानिमित्त तसेच उच्च शिक्षणासाठी अमेरिका, इंग्लंड अशा विविध ठिकाणी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत परदेशात सुद्धा मराठी परंपरा जपल्या जात आहेत. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना ढोल-ताशा वादनाचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे. अशाच एका उपक्रमात अश्विनी भावे सुद्धा सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी ढोल वादनाचा सराव केला. यावर्षी दर तीन महिन्यांनी काहीतरी नवीन शिकायचं असा संकल्प त्यांनी केला होता. या ढोल-ताशा वादनाच्या निमित्ताने त्यांचा हा संकल्पही पूर्ण झाला आहे.

अश्विनी भावे म्हणतात, “तुम्हाला आठवत असेल तर, यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की, मी आता दर तीन महिन्यांनी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. जे आपण ठरवतो ते प्रत्येकवेळी होतंच असं नाहीये…पण, आज मला एक नवीन संधी मिळालीये. आता मी ढोल-ताशा वाजवायला शिकणार आहे. पुण्यातल्या मिरवणुकांचे व्हिडीओ पाहून मला नेहमी वाटायचं की, अरे आपल्याला ही संधी केव्हा मिळेल? तर, आता मला कॅलिफोर्नियामध्ये ही संधी मिळालीये. स्पार्टन्स ढोल-ताशा पथक यांनी मला आमंत्रण दिलंय. आता बघुयात मला जमतंय का…”

“MMBA स्पार्टन्स’ (MMBA Spartans) या ग्रुपचे मनापासून आभार कारण, त्यांच्यामुळे मला ही नवीन संधी मिळाली. अर्थात, ढोलचं वजन मला झेपेल का, याची मला जरा शंकाच होती. पण, काहीही झालं तरी, मी प्रयत्न करणारच आहे. गणपती बाप्पा मोरया!” अशी पोस्ट अश्विनी भावेंनी शेअर केली आहे.

आता ढोल वादन शिकल्यावर, रितसर सराव केल्यावर अश्विनी भावे मूळ कार्यक्रमातही यंदा सहभागी होणार आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह परदेशताही अशाप्रकारे संस्कृती जपली जातेय हे पाहून छान वाटलं”, “नवीन स्किल्स शिकणं हे फार महत्त्वाचं असतं…मस्तच”, “वाह- वाह मस्तच”, “मॅडम खूप छान..” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.