Ashwini Kalsekar on Not Having Kids : मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांनी मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. अश्विनी एकता कपूरच्या ‘कसम से’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारून घराघरांत पोहोचल्या. त्या दोन दशकांहून जास्त काळांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांचे पती मुरली शर्मादेखील अभिनेते आहेत. ५४ वर्षीय अश्विनी यांना मूल नाही. त्या आई न होऊ शकण्याबद्दल व्यक्त झाल्या होत्या.
अश्विनी काळसेकर यांना मूल नसण्याबाबत हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. बाळासाठी प्रयत्न केले पण काही शारीरिक समस्यांमुळे अडचणी आल्या असं त्यांनी सांगितलं.
“खरं तर आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न केले. पण मला किडनीची समस्या आहे. त्याकाळी सरोगसीची फॅशन नव्हती. आमच्याकडे तेवढे पैसेही नव्हते. आम्ही संघर्ष करत होतो, बाळासाठी प्रयत्न करत होतो. मग एक वेळ अशी आली की डॉक्टर म्हणाले, ‘तुझी किडनी भार उचलू शकत नाही. तर यामुळे एकतर तुझ्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील किंवा बाळावर होतील’. त्यानंतर डॉक्टरांनी पूर्णपणे नकार दिला. मग आम्ही सरोगसीसाठीही प्रयत्न केला नाही,” असं अश्विनी म्हणाल्या.
जे हवं होतं ते मिळू शकलं नाही – अश्विनी काळसेकर
“मला जे हवं होतं ते मिळू शकलं नाही. हा सगळा नशिबाचा भाग आहे. मी पारंपरिक विचारांची असल्यामुळे मला बाईपणाचं एक पूर्ण वर्तुळ जगायचं होतं; पण ते नाही होऊ शकलं. कदाचित माझ्या नशिबात माझे सासू-सासे व आई-वडिलांची सेवा करणं लिहिलेलं होतं. तेही आता आमच्या मुलांसारखे आहेत, त्यामुळे मी त्यांची सेवा करतेय,” असं अश्विनी काळसेकर म्हणाल्या.

मूल नसल्याने पाळले श्वान
अश्विनी व मुरली शर्मा यांनी मूल नसल्याने दोन श्वान पाळले आहेत. ते श्वान मुलांसारखे आहेत. त्यांच्यासाठी एक नॅनी ठेवली आहे, जी त्यांची काळजी घेते, असं अश्विनी काळसेकर यांनी सांगितलं.
अश्विनी काळसेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांना ‘कसम से’ या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. मग त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. ‘हमारे बारह’, ‘जोधा अकबर’, ‘फू बाई फू’ आणि ‘फूंक’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अश्विनी यांनी २००९ मध्ये मुरली शर्मा यांच्याशी दुसरं लग्न केलं. मुरली शर्मादेखील सिनेविश्वात सक्रिय आहेत. मुरली शर्मा यांनी ‘देवरा: पार्ट 1’ सह अनेक चित्रपटांचा भाग आहे.