Marathi Actress On Bold Scenes Criticism : नेहमी हटके आणि वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जाणारे महेश मांजरेकर त्यांच्या एका चित्रपटाने वादात सापडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’. चित्रपटातील बोल्ड सीनमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

चित्रपटात एका अल्पवयीन मुलाचे एका स्त्रीशी काही बोल्ड सीन दाखवण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटावर बरीच टीका झाली होती. या टीकेवर आता चित्रपटातील अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटात काकीची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी कुलकर्णीनं बोल्ड सीनमुळे झालेल्या टीकेवर नुकत्याच एका मुलाखतीत तिचं स्पष्ट मत मांडलं.

त्या भूमिकेनंतर जे झालं, त्यासाठी मी तयार नव्हते – अश्विनी कुलकर्णी

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोल्ड भूमिकेबद्दल अश्विनी म्हणाली, “खरं सांगायचं, तर टीकेबद्दल विचार केला नव्हता; पण मी याआधी तशी बोल्ड भूमिकासुद्धा केली नव्हती. वाचन असल्यानं जयंत पवार यांचं साहित्य वाचलं होतं. त्यामुळे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे, ते पुस्तक मी वाचलं होतं. त्या भूमिकेबद्दल महेश मांजरेकरांना विश्वास होता. त्यामुळे मीसुद्धा ते करू शकते, असं मला वाटलं. पण त्या भूमिकेनंतर जे झालं, त्यासाठी मी तयार नव्हते. काकीची भूमिका मी महेश मांजरकरांकडे मागून घेतली होती. पहिल्या वाचनानंतरच मी त्यांना ते सांगितलं होतं. त्यामुळे त्याचे परिणाम काय होतील, याआधीच मला ती भूमिका करायची आहे, असं मी महेश मांजरेकरांना सांगितलं होतं.”

Award Banner

त्याचे जे परिणाम झाले, त्याचं वाईट वाटलं नाही पण – अश्विनी कुलकर्णी

पुढे ती म्हणाली, “त्या भूमिकेचा एक आलेख आहे. सुरुवातीला त्या मुलाचा तिरस्कार करणं, मग त्याच मुलावर प्रेम दाखवणं आणि मग तो मुलगा गेल्यानंतर वेड लागणं… असा त्या भूमिकेचा एक प्रवास आहे. त्यासाठी महेश मांजरेकरांचा खूपच खंबीर पाठिंबा होता. माझ्या कम्फर्टनुसारच सगळं शूट झालं आहे. मुळात मला घरच्यांचा पाठिंबासुद्धा होता. नवऱ्यानं मला या सगळ्यासाठी एक विश्वास दिला होता. अपेक्षित होतं, त्याप्रमाणे मला ती भूमिका करता आली. त्याचे जे परिणाम झाले, त्याबद्दल वाईट वाटलं नाही; पण मी त्यासाठी तयार नव्हते.”

जे लोक जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले – अश्विनी कुलकर्णी

पुढे अभिनेत्री म्हणाली, “त्या काळात मला टीकेची भीती वाटली नाही; पण जे लोक जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले. आपल्याला जे वाटतं की, हे आपले किती जवळचे मित्र आहेत, त्यांचे खरे चेहरे कळले. त्यामुळे त्या टीकेचा हा एक फायदा झाला. कोण आपले आहेत, कोण नाहीत आणि आपले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे तर किती आपले नाहीत हे त्या चित्रपटानंतर कळलं. तसेच एक अभिनेत्री म्हणून प्रगल्भ झाल्यासारखंसुद्धा मला वाटलं. आधी कॅमेऱ्यासमोर काम करताना मी कोणतंही काम कसंही करू शकते, असं मला वाटायचं; पण त्या चित्रपटाच्या वेळी मला कळलं की, अजून किती शिकायचं बाकी आहे.”

दरम्यान, ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटात अश्विनी कुलकर्णीसह छाया कदम, शशांक शेंडे, कश्मिरा शाह, प्रेम धर्माधिकारी, गणेश यादव व अतुल काळे यांच्यादेखील भूमिका आहेत.