Raja Shivaji Movie : गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर सुद्धा ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला चांगलं यश मिळतंय. यामध्ये मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. यासह मराठी टेलिव्हिजनवरील काही लोकप्रिय कलाकार सुद्धा ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकले आहेत.

कपिल होनराव, शिवानी मुंढेकर, दिशा परदेशी असे बरेच कलाकार या सिनेमात झळकले आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा परदेशीने ‘राजा शिवाजी’ चित्रपटात अफझल खानच्या बेगमची भूमिका साकारली आहे. अफझल खान स्वराज्यावर चालून येण्यापूर्वी त्याच्या ६३ बेगमची हत्या करतो. हा सीन दिशा परदेशीसह अन्य महिला कलाकारांनी अंडरवॉटर शूट केला आहे. यादरम्यानचा अनुभव सांगत दिशाने सेटवरचे काही फोटोही शेअर केले आहेत.

दिशा परदेशी लिहिते, “राजा शिवाजी’ सिनेमात मी अफझल खानच्या बेगमची भूमिका साकारली आहे. यादरम्यान, मला एक अंडरवॉटर सीक्वेन्स शूट करायचा होता. यासाठी आम्ही पाण्यात शूट केलं. ही भूमिका साकारताना मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.”

“या संपूर्ण अंडरवॉटर सीक्वेन्ससाठी रितेश सरांनी आम्हाला सगळ्यांना आधीपासूनच उत्तम ट्रेनिंग दिलं होतं. पाण्यात शूट कसं करायचं, चेहऱ्यावरचे हावभाव, आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि प्रत्येक शॉटची अचूक तयारी…हे सगळं इतकं बारकाईने प्लॅन केलं गेलं होतं की, आमच्या मनात हा सीन शूट करण्याआधी एक आत्मविश्वास तयार झाला होता.”

“आमच्या सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतल्यामुळे हा कठीण सीनही खूप सहज झाला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.” असं दिशा परदेशीने सांगितलं.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने पहिल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर ४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये रितेश देशमुखसह अभिषेक बच्चन, संजय दत्त, भाग्यश्री, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, विद्या बालन, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी आणि जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.