Gargi Datar got Married: मराठी मालिकाविश्वात लगीनघाई सुरू आहे. नुकतीच अभिनेत्री रेवती लेले हिने लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर एतशा संझगिरीने अभिनेता निषाद भोईरशी लग्न केलं. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे, विशाल निकम व अक्षया हिंदळकर हेही काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. आता एका आणखी अभिनेत्रीने लग्न उरकलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे गार्गी दातार होय.
मराठी अभिनेत्री गार्गी दातार नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ‘लेक असावी तर अशी’, ‘असा मी तसा मी’, ‘रुपनगर के चिते’, ‘रानभुल’ अशा मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या गार्गी दातारने वैयक्तिक आयुष्यात पुढचं पाऊल टाकलं आहे. गार्गीने मिहीर खोत याच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली.
गार्गी व मिहिर यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अद्याप गार्गीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली नसली. तर तिने स्टोरीवर मात्र अनेक फोटो व व्हिडीओ रिपोस्ट केले आहेत. त्यात गार्गीने लग्नात हिरवी साडी नेसल्याचं दिसत आहे. तर मिहिरने पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.
पाहा गार्गीच्या लग्नाचे फोटो

दरम्यान, गार्गी दातार व मिहीर खोत यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. ते एकत्र फिरायला जायचे. अशाच एका ट्रिपमध्ये मिहिरने गार्गीला प्रपोज केलं होतं आणि गार्गीने मिहिरला लग्नासाठी होकार दिला होता. तेव्हापासून दोघे एकत्र होते. आता दोघेही कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.
गार्गी दातार व मिहीर खोत यांना पुढील वैवाहिक आयुष्यासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. गार्गी दातारबद्दल बोलायचं झाल्यास विजय कोंडके यांच्या ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. गार्गी दातार ही कथ्थक नृत्यांगना व शिक्षिका आहे. अभिनयाबरोबरच ती विद्यार्थ्यांना कथ्थकही शिकवते.
गार्गी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे साडीतील फोटोशूट आणि ग्लॅमरस लूक अनेकदा चर्चेत असतात. ती इन्स्टाग्रामवर तिचे अपडेट्स शेअर करत असते, तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.

