Girja Oak National Crush : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणालाही नसतो. कधी गाणी व्हायरल होतात, कधी नवीन ट्रेंड सुरू होतो, काहीवेळा विशिष्ट सिनेमाची चर्चा सुरू होते तर, अनेकदा काही सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हटलं जातं. कारण, काही वर्षांपूर्वी तिचे क्युट फोटो, साऊथ सिनेमांतील काही सीन्स सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते.
आता सध्या फिकट निळी साडी नेसलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मराठी अभिनेत्री गिरिजा ओक आहे. मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गिरीजाचा साडीतील फोटो अन् तिच्या सुंदर लूकची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. स्लीवलेस ब्लाउज, सुंदर साडी या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. हा फोटो सर्वत्र व्हायरल होऊन चाहते तिला ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणू लागलेत. तिने काही दिवसांपूर्वीच लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. गिरीजाचे Physics विषयाचे शिक्षक ‘Waves’ शब्दाचा उच्चार चुकून ‘Babes’ असा करायचे हा किस्सा तिने या मुलाखतीत सांगितला होता; ज्याच्या व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
मराठी, हिंदी आणि कन्नड इंडस्ट्रीमधील विविध चित्रपटांमध्ये गिरिजा ओकने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून गिरिजाचा फिकट निळ्या रंगाच्या साडीमधला फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. ही हँडलूम साडी प्रिया बापटच्या Sawenchi ब्रँडची आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी गिरिजा ‘न्यू नॅशनल क्रश’ आहे असं देखील जाहीरपणे सांगितलं आहे. अभिनेत्रीचं सौंदर्य, तिची अभिनयशैली तसेच गिरिजाचं व्यक्तिमत्त्व याचं चाहते कायम कौतुक करतात.
गिरिजाने २००७ मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबरोबर ‘तारे जमीन पर’ सिनेमात काम केलं होतं. यानंतर २०२३ मध्ये ती शाहरुख खानच्य ‘जवान’ सिनेमात झळकली होती. गिरिजाचा जन्म २७ डिसेंबर १९८७ रोजी नागपूर येथे झाला. २०११ मध्ये तिने निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं.
दरम्यान, गिरिजा अलीकडेच ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिने बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयीसह स्क्रीन शेअर केली होती.
