सोशल मीडियाद्वारे प्रत्येक विषयांवर आपलं मत मांडणं बऱ्याच कलाकार मंडळींना आवडतं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण सोशल मीडियाद्वारेही ती चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तसेच प्रत्येक विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडते. आताही वटपौर्णिमेनिमित्त तिने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेणारी आहे.
हेमांगीने वटपौर्णिमेनिमित्त उपवास धरला नाही. पण यामागे नेमकं कारण काय? वटपौर्णिमा तिने कशी साजरी केली? याबाबत हेमांगीने भाष्य केलं. ती म्हणाली, “काल वटपौर्णिमा होती. परवा रात्री चित्रीकरण उशीराने संपलं, त्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे दोन फोटो पाठवले होते. मी त्यावर रिप्लाय करत म्हटलं, “हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे”. त्यावर त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!”.
आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
“थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारात मी त्याला म्हटलं, “ते फोटो कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा बिस्कीट खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा ना…तू ते काही बाही सोशल मीडियावर लिहितेस ना… त्यासाठी म्हणून फोटो पाठवले. तुला पोस्टच्या खाली टाकता येतील” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी त्याने माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला”.
“त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं. मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “वटपौर्णिमेच्या शुभेच्छा”. हेमांगीने या पोस्टमध्ये खास टिपही दिली आहे. ती म्हणाली, “कालच ही पोस्ट टाकणार होते. पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं, असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी”. हेमांगीच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.