Actress Kishori Godbole Daughter : आपल्या मुलांनी आयुष्यात खूप नाव कमवावं, मोठं व्हावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. मराठी अभिनेत्रीच्या लेकीने आपल्या आईचं हेच स्वप्न पूर्ण केलं आहे. ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेमुळे अभिनेत्री किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाली. आजवर तिने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आता किशोरीची लेक इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे. तिच्या लेकीचं नाव आहे सई गोडबोले.

सई मुळातच खूप जास्त हुशार आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच…याचबरोबर सई कंटेट क्रिएटर म्हणूनही ओळखली जाते. ती ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. आता सईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ती नुकतीच इंटरनॅशनल ब्रँडच्या जाहिरातीत झळकली आहे. याबाबत जाणून घेऊयात…

सई गोडबोले L’Oréal Paris च्या जाहिरातीत झळकली असून, त्यांच्या नव्या प्रोडक्टच्या पॅकेजवर सुद्धा सईचा फोटो आहे. अभिनेत्री म्हणते, “मी L’Oréal Paris च्या कास्टिंग क्रीम ग्लॉसच्या पॅकवर झळकलेय. हा लिमिटेड एडिशन शेड आहे आणि हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं असून माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि माझ्या प्रत्येक निर्मितीला पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आता तुम्हाला ‘स्पाइस्ड सिनेमन ब्राउन’ हा शेड नक्कीच विकत घ्यायचा आहे कारण, याच्या पॅकवर माझा चेहरा आहे. हा हेअरकलर खास भारतातील मुलींसाठी डिझाइन करण्यात आला आहे.”

लेकीला मिळालेलं हे यश पाहून तिची आई किशोरी गोडबोलेचा आनंद सुद्धा गगनात मावेनासा झाला आहे. किशोरी यावर कमेंट करत लिहिते, “ही जाहिरात खरंच खूप सुंदर आहे…सई तू खूप क्रिएटिव्ह आहेस. लय भारी बेटा…मला तुझा खूप-खूप अभिमान आहे. तुझ्यावर देवाचा आशीर्वाद असाच कायम राहो!”

तर, पूजा सावंतने या पोस्टवर “Queen सई” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा सईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, सईची आई किशोरी गोडबोलेबद्दल सांगायचं झालं तर, ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेमुळे अभिनेत्री किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाली. ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्री सध्या कलाविश्वापासून लांब असली तरीही अलीकडे सोशल मीडियावर तिच्या लेकीची जोरदार चर्चा चालू आहे.