Actress Kranti Redkar reveals twin daughters faces : लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर व तिचे अधिकारी पती समीर वानखेडे यांना जुळ्या मुली आहेत. क्रांती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती मुलींबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायची, पण त्यात ती मुलींचे चेहरे दाखवत नव्हती. त्यामुळे तिच्या मुली नेमक्या कशा दिसतात, याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. आता क्रांती रेडकरने स्वतःच व्हिडीओ शेअर करून जुळ्या मुलींचे चेहरे दाखवले आहेत.

सोहम बांदेकर व पूजा बिरारी यांच्या रिसेप्शन सोहळ्याला क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे व जुळ्या मुलींबरोबर हजेरी लावली होती. रिसेप्शनमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले, त्यात क्रांतीच्या मुली छबिल व गोदो यांचे चेहरे दिसत होते. त्यामुळे आता स्वतःच्या व्हिडीओमध्ये क्रांतीने मुलींचे चेहरे न लपवायचा निर्णय घेतला आणि त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

क्रांती रेडकरच्या मुलींची नावं ‘झिया’ व ‘जायदा’ आहेत. पण ती त्यांनी प्रेमाने छबिल व गोदो म्हणते. दोघीही त्यांच्या टोपणनावानेच ओळखल्या जातात. क्रांतीने चेहरे रिव्हिल झाले, याबद्दल मुलींच्या प्रतिक्रिया काय आहेत, असा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Award Banner

“काही दिवसांपूर्वी एका लग्न सोहळ्यात छबिल व गोदो यांचे चेहरे रिव्हिल झाले. खूप साऱ्या मीडिया पेजेसनी त्यांचे व्हिडीओ पोस्ट केले. परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली आणि आम्ही नियंत्रित करू शकलो नाही. आता त्यांचे चेहरे लपवून काहीच फायदा नाही, याची जाणीव आम्हाला झाली आहे. खरं तर ते हास्यास्पद वाटेल. त्यांच्या सामान्यपणे जगण्याच्या इच्छांना आम्ही दाबून ठेवू इच्छित नाही. भीती असली तरी त्यांनी सतत भीतीत मोठं व्हावं, असं आम्हाला वाटत नाही. त्यांनी कणखर व्हावं, सतत कोणाच्या आश्रयात असू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आतापासून हे सगळं सोपं करतेय. यापुढे चेहरे लपवायचे नाही. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा एवढीच तुम्हा सर्वांना विनंती,” असं कॅप्शन क्रांती रेडकरने व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओत गोदो व छबिल एकमेकींना म्हणतात, आईने आपले चेहरे लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता आपले चेहरे रिव्हिल झाले आहेत. दोघीही आपण खूप दुःखी असल्याचं म्हणतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. क्रांती रेडकरच्या मुलींच्या या मजेशीर व्हिडीओवर सर्वजण लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मयुरी देशमुखने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ‘दोघी अगदी तुझ्या सारख्या.. गोड गोड आहेत ताई,’ ‘मजेशीर आहेत… आगाऊ… मस्ती… कशी सांभाळते क्रांती तू दोघींना….डॅडी ना घाबरतात की नाही,’ ‘आता छबिल गोदो आईच्या रील्समध्ये दिसणार, खूप मज्जा येईल,’ ‘दोघीही खूप गोड आहेत,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.