ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात त्यांचं निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री मधु कांबीकर या आजारांशी झुंज देत होत्या. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मधु कांबीकर यांनी कारकिर्दीची सुरुवात लावणी कलावंत म्हणून केली होती
मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ ला बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून मधु कांबीकर यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. तसंच आज झाले मुक्त मी या चित्रपटातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
२०१८ मध्ये मधु कांबीकर यांना झी चित्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधु कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. मला अशी सासू लाभली हे माझं भाग्य आहे असं त्या म्हणाल्या होत्या. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. झपाटलेला आणि एक होता विदूषक या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी कामं केली होती. नाना पाटेकर, ऋषी कपूर अभिनीत हम दोनो या चित्रपटात मधु कांबीकर यांनी नाना पाटेकरांची आई साकारली होती.
२०१६ ला पक्षाघाताचा झटका
मधु कांबीकर यांना मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात २०१६ मध्ये असलेल्या एका लावणी कार्यक्रमात पक्षाघाताचा झटका आला होता. त्यांना तातडीने स्टेजवरून मेकरूममध्ये आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची एक बाजू लुळी पडली होती. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी भैरवीचे सादरीकरण पूर्ण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यावर त्यांना पक्षाघाताचा झटका आला. या घटनेत त्यांच्या उजव्या हातावर परिणाम झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू करण्यात आले. पक्षाघाताच्या झटक्यानंतर मधू कांबीकर यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी आढळल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. या आरोग्यविषयक अडचणींमुळे त्यांना पूर्वीप्रमाणे चित्रपट, नृत्य आणि रंगमंचावर सक्रिय राहणे शक्य झाले नाही. काही दिवसांपूर्वी उपचार घेत असतानाचा त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता.
