मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत नेहा जोशीने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये ती विविध भूमिका साकारत आहे. सध्या नेहा ‘दुसरी मां’ या मालिकेत काम करत आहे. नेहा तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात तिने गुपचूप लग्न करत सगळ्यांना सुखद धक्का दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत तसेच पतीबाबत भाष्य केलं आहे.
नेहाने ओमकार कुलकर्णीशी लग्न केलं. अगदी २० ते २५ लोकांच्या उपस्थितीत या दोघांनी घरगुती लग्न केलं. इतकंच नव्हे तर लग्नासाठी तिने फक्त मंगळसुत्राची खरेदी केली होती. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं आहे. नेहा म्हणाली, “गेल्यावर्षी १६ ऑगस्टला अभिनेता ओमकार कुलकर्णीबरोबर मी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर २१ ऑगस्टला आम्ही दोघांनीही आमच्या कामाला सुरुवात केली. तिथपासून ते आतापर्यंत फक्त चार ते पाच वेळा आमची भेट झाली आहे”.
“मी स्वतःची तुलना ओमकारबरोबर करत नाही. कारण तो मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतो. मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवते. मी लग्नही अगदी साध्या पद्धतीने केलं. फक्त २० ते २५ लोकांच्या उपस्थित घरामध्येच माझ लग्न झालं. कमी लोकांमध्येच लग्न झालं पाहिजे हिच माझी अट होती. मंगळसुत्र व्यतिरिक्त मी इतर कोणतेही दागिने लग्नासाठी खरेदी केले नाही”.
पुढे नेहा म्हणाली, “लग्नासाठी जे लोक दागिने खरेदी करतात त्यांना मी दोष देत नाही. पण जे लग्नासाठी दागिने खरेदी करत नाहीत त्यांच्यावर जबरदस्ती करु नये. खरं तर लग्न एका उत्सवाचं निमित्त असतं. पूर्वीच्या काळात उत्सव व सण साजरे करण्याची संधी फार कमी होती. पण अलिकडे प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन केलं जातं”. नेहा तिचं आयुष्य अगदी तिच्यापद्धतीने जगते हे बोलण्यामधून दिसून आलं.
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress neha joshi talk about her marriage says from marriage i meet my husband only 4 5 times see details kmd