छोट्या पडद्यावरील गाजणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक मालिका म्हणून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ या मुख्य भूमिकेत झळकत आहेत. यात त्यांनी रत्नमाला मोहिते हे पात्र साकारले आहे. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. नुकतंच निवेदिता सराफ यांनी कलाकारांनी अपग्रेड कसं व्हावं? याबद्दल भाष्य केले. निवेदिता सराफ या गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहेत. त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. नुकतंच त्यांनी सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना कलाकारांनी अपग्रेड कसं व्हायचं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच स्पष्टपणे उत्तर दिले.आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…” "आता आजूबाजूला काय चाललंय हे बघणं फार महत्त्वाचं असतं. मी जेव्हा पुन्हा मालिका करायला सुरुवात केली, तेव्हा मी मालिका विश्वात त्यावेळी सुरु असलेल्या सर्व चॅनलवरील सर्व मालिका पाहिल्या. ते फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मराठी चित्रपट करत असाल तर तुम्हाला आजूबाजूला काय घडतंय, कोण काय करतंय, याची तुम्हाला माहिती हवी. तुम्ही फक्त हॉलिवूडचे चित्रपट पाहून मराठी चित्रपटात काम करु शकत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नेटफ्लिक्स पाहून ते होऊ शकत नाही. आता आजूबाजूला बाकीचं काय चाललंय, कोणत्या मालिकेला टीआरपी आहे, याची सर्व माहिती तुम्हाला असायला हवी. त्यात कोण कसा अभिनय करतंय, आपण कसा अभिनय करायला हवा आणि कसा नाही, हे देखील तुम्हाला ओळखला यायला हवं", असे निवेदिता सराफ यांनी म्हटले. आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…” दरम्यान निवेदिता सराफ यांनी वयाच्या ५ व्या वर्षीपासून सिनेसृष्टीत काम केले. लग्नानंतर मात्र निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांनी मुलगा अनिकेतच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. अनिकेतच्या जन्मानंतर तब्बल १४ वर्षे त्या सिनेसृष्टीपासून लांब होत्या. पण त्यानंतर त्यांनी ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. त्यांची ही मालिका प्रचंड गाजली.