Marathi Actress Pooja Sawant : महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. प्रत्येक सिनेमांमध्ये हटके आणि विविधांगी भूमिका साकारण्याकडे पूजाचा कल असतो. पूजाचा जन्म मुंबईतला आणि तिचं शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून पूर्ण झालं आहे. पूजाने मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यामुळे मराठी भाषेवर तिचं विशेष प्रभुत्व आहे.

पूजा काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती की, शाळेमुळे तिच्यावर उत्तम संस्कार झाले. संस्कृत विषय तसेच, स्त्रोत्र पठन या गोष्टी पूजाच्या शाळेत अनिवार्य होत्या. मुलांच्या जडणघडणीमध्ये शाळेचा खूप मोठा वाटा असतो असं अभिनेत्री कायमच सांगत आलीये. पूजाचं भाषेवरचं प्रभुत्व खूप चांगलंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण, सध्या तिचा मराठी म्हणी अचूक ओळखतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरजे गायत्री या व्हिडीओमध्ये पूजाला काही इमोजी दाखवते आणि या इमोजीवरून तिला म्हणी ओळखायला सांगते. पहिल्या इमोजी बॉक्समध्ये पूजाला गाढव, चौकोनी बॉक्स, जीभ अशी चित्रं पाहायला मिळतात यावरून ती पटकन ओळखते ही म्हण आहे, “गाढवाला गुळाची चव काय?” यानंतरच्या म्हणी आहेत…’पी हळद आणि हो गोरी’, ‘घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ’

शेवटच्या इमोजीमधील म्हण पूजाला ओळखता येत नाही पण, कमेंट्समध्ये चाहत्यांनी ही म्हण अचूक ओळखली आहे. ही म्हण आहे…कामापुरता मामा, ताकापुरती आजी!

पूजाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत तिला ‘Beauty With Brain’ म्हटलं आहे. याशिवाय, “पूजा किती हुशार आहे”, “पूजाने म्हणी अचूक ओळखल्या”, “आमची हुशार पूजा” अशा प्रतिक्रिया सुद्धा नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

दरम्यान, पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती प्रमुख भूमिकेत असलेले अनेक सिनेमे यंदाच्या वर्षात प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये ‘सालबर्डी’, ‘कपबशी’, ‘दृश्य-अदृश्य’ या सिनेमांचा समावेश आहे.

आता पूजा ‘भेटली तू पुन्हा’च्या दुसऱ्या भागात वैभव तत्त्ववादीबरोबर झळकणार आहे.