अभिनेता प्रथमेश परबनंतर अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकली. काल, २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला. लग्नातील खास क्षणाचे फोटो नुकतेच पूजा सावंतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण सिद्धेशचा पहिला फोटो पाहिल्यानंतर पूजाची रिअ‍ॅक्शन काय होती? जाणून घ्या…

अभिनेत्री पूजा सावंतने नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने सिद्धेशचा पहिला फोटो पाहिल्यानंतर तिला काय वाटलं? याविषयी सांगितलं. पूजा म्हणाली, “जेव्हा हे स्थळ आलं तेव्हा रुची (बहीण) आणि आई त्यांनी सिद्धेशचा पहिला फोटो पाहिला होता. त्यांचं चाललं होतं की, दीदीला हा फोटो दाखवायचा का? रुची म्हणाली, तिला दाखव. तिला हा आवडेल. यावेळेस माझी ती फेज होती की, मला लग्न नाही करायचं आहे. थांबा जरा. करिअर वगैरे आहे. त्यात रुची आली म्हणाली, दीदी एक स्थळ आलंय. तू फक्त फोटो बघ, असं काही ठाम नाही. मी म्हणाले, रुची नाही. मला आता शूट असून मला जायचं आहे. पण दोघींनी फोटो बघना तू, असं करत त्यांनी मला मोबाइलमध्ये फोटो दाखवला. मी फोटो पाहिला आणि घाईघाईत चाललेले मी थांबले. म्हटलं, याचं नाव काय? अशी मी छोटीशी विचारपूस केली. मग त्यानंतर सुरू झालं.”

हेही वाचा – पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण

पुढे पूजा म्हणाली, “फोटो पाहिला त्याच रात्री मी त्याला मेसेज केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याच्याशी फोनवर बोलले. मला याआधी लॉकडाऊनमध्ये एक स्थळ आलं होतं; जे माझ्या वडिलांना खूप जुळावं असं वाटतं होतं. पण मी नाही केलं. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांचं ऐकलं नाही. पण सिद्धेशच्या बाबतीत मला कोणीचं बोललं नाही फोन कर, एकदा बोलू घे वगैरे. मी त्याला फोटो पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहज फोन केला. कसं आहे? काय आहे? वगैरे विचारलं. मी जेव्हा फोन केला तेव्हा तो ऑफिसमध्ये होता. पण त्यानंतर तो स्वतःहून मेसेज आणि फोन करायला लागला. मग आमचं बोलणं सुरू झालं.”

हेही वाचा – Video: शिवानी बावकर-आकाश नलावडेच्या ‘साधी माणसं’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो समोर, मराठी कलाकार म्हणाले…

दरम्यान, पूजा व सिद्धेशचा साखरपुडा झाल्यापासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. दोघांचा लग्नसोहळा पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होते. त्यानंतर संगीत, मेहंदी, हळद, ग्रहमख आणि सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्न पूजा व सिद्धेशचं पार पडलं.