Prajakta Mali Buys Luxury Flat Mumbai: लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोची सूत्रसंचालक प्राजक्ता माळीने मुंबईत घर घेतलं आहे. प्राजक्ताने स्वतःच्या हक्काचं दुसरं आलिशान घर खरेदी केलं आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’च्या नोंदणी कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने गोरेगाव पूर्व येथील हाय-प्रोफाइल ‘ओबेरॉय एक्सक्युझिट’ (Oberoi Exquisite) मध्ये हा फ्लॅट खरेदी केला आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, २८ व्या मजल्यावर असलेल्या या स्वप्नवत घरासाठी तिने ३२.१२ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

‘सीआरई मॅट्रिक्स’वरील मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने गोरेगाव पूर्व येथील Oberoi Exquisite मध्ये ६.४२ कोटी रुपयांना ९९६ चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी केला आहे. ओबेरॉय एक्सक्युझिटच्या ‘टावर सी’ मधील २८ व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी या फ्लॅटच्या व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया सुमारे ९९६ चौरस फूट आहे आणि त्याचबरोबर २४० चौरस फुटांची एक टँडम कार-पार्किंग जागा देखील आहे.

प्राजक्ता माळीच्या फ्लॅटची किंमत किती?

प्राजक्ता माळीने ही मालमत्ता नूर खान आणि युसूफ अली खान यांच्याकडून खरेदी केली आहे. खरेदीच्या कागदपत्रांनुसार, या फ्लॅटची किंमत ६.४२ कोटी रुपये आहे. त्यासाठी प्राजक्ताने ३२.१२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.

फ्लॅटसाठी प्राजक्ता माळीने घेतलंय होम लोन

६.४२ कोटी रुपयांच्या या फ्लॅटसाठी प्राजक्ताने इंडियन बँकेकडून ५.७८ कोटी रुपयांचे होम लोन घेतले आहे. हे लोन २८ जुलै २०२६ रोजी मंजूर झाले होते. म्हणजेच, प्राजक्ताने फ्लॅटच्या एकूण किमतीपैकी जवळपास ९० टक्के रक्कम ही लोनमधून दिली आहे आणि उर्वरित रक्कम आणि व्यवहाराचा इतर खर्च तिने स्वतः केला.

अमिताभ बच्चन यांचे होते दोन फ्लॅट

प्राजक्ता माळीच्या या खरेदीच्या आधीही अनेक बॉलीवूड कलाकारांनी या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ओबेरॉय एक्झिक्युझिटमधील प्रत्येकी ६ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट एकूण १२ कोटी रुपयांना विकले. सुमारे १,८२० चौरस फुटांचे हे दोन्ही फ्लॅट त्यांनी २०१२ मध्ये ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. १३ वर्षांत त्यांना या फ्लॅटमधून ४७ टक्के नफा मिळाला.

रणवीर सिंहनेही केलेली गुंतवणूक

२०२३ मध्ये अभिनेता रणवीर सिंहने याच सोसायटीतील आपले दोन फ्लॅट १५.२४ कोटी रुपयांना विकले. १,३२४ चौरस फूट कार्पेट एरिया असलेले हे फ्लॅट रणवीरने २०१४ मध्ये प्रत्येकी ४.६४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.