scorecardresearch

Video : “अगदी मरेपर्यंत…” प्राजक्ता माळीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“यश मिळालं आहे ते टिकवण्यामध्येही तो आहे.”

prajakta mali
प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या सिनेसृष्टीतील संघर्षाबद्दल सांगितले आहे.

प्राजक्ताने नुकतंच ‘झी युवा सन्मान २०२३’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिला सिनेसृष्टीतील संघर्षाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने स्पष्टपणे उत्तर दिले. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा घटक आहे. हे प्रत्येकाने स्वीकारायला हवं, असे प्राजक्ता माळी म्हणाली.
आणखी वाचा : “माझा प्रेमावर…” ब्रेकअपनंतर प्राजक्ता माळीने पहिल्यांदा केले प्रेमाबद्दल भाष्य

प्राजक्ता माळी काय म्हणाली?

“मी ज्यावेळी संघर्ष करत होती त्यावेळी आर्थिक संघर्ष होता. मी पुण्याची असल्याने मला स्थलांतर करावं लागणार होतं. तेव्हा मुंबईत एकही नातेवाईक नव्हता. तेव्हा मुंबई नवीन होती, कुटुंबाला सोडून राहणं नवं होतं. माझी आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. माझे वडील पोलिसात होते, त्यामुळे इतकेच पैसे आहे, यातच सर्व बसवायचं हे असं वातावरण घरात होतं. त्यावेळी लोकल ट्रेन म्हणजे अगदी मुंबई- पुण्याच्या मालगाडीतूनही मी प्रवास केला आहे.

मुंबईतील सिनेसृष्टीत किंवा सेटवर जे वातावरण आहे. चढाओढ, राजकारण, गॉसिप्स, अंतर्गत राजकारण या सर्व गोष्टी आहेत. अभिनेत्रींविषयी तर स्पेशली तिला आपण कसं नव्या पद्धतीने छळू शकतो असं सर्व होत असतं. या सर्वच बाबतीत संघर्ष होता आणि आताही आहे. आता फक्त झोन बदलला आहे. मला वाटतं तो कायम असणार आहे.

आता फक्त तो आर्थिक राहिलेला नाही. मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या जास्त आहे. यश मिळालं आहे ते टिकवण्यामध्येही तो आहे. हे अव्याहतपणे अगदी मरेपर्यंत चालू राहणार आहे. ते कधीही संपणार नाही आणि मी ते स्वीकारलं आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा घटक आहे, हे प्रत्येकाने स्वीकारायला हवं”, असे प्राजक्ता माळीने म्हटले.

आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 12:03 IST