Prajaktta Mali Birthday special vegan post: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज ८ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचे दर्शन घेतले आहे. दर्शनानंतर प्राजक्ताने चाहत्यांना एका मोठ्या निर्णयाबद्दल माहिती दिली. प्राजक्ताने आता पूर्णपणे व्हिगन (Vegan) होण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारणही तिने स्पष्ट केले आहे.
प्राजक्ता माळीने पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. इन्स्टाग्रामवर तिने तिचे दर्शन घेतानाचे ४ फोटो पोस्ट केले आहेत. “आज सकाळी सिद्धिविनायक आणि आई तळजाई माता यांचे दर्शन घेतले आणि या क्षणापासून मी व्हिगन (Vegan) होण्याचा निर्णय घेतला आहे. मर्जीने नाही, तर सक्तीने. माझं शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारत नाहीये, त्यामुळे मला सतत खोकला येत होता. त्यामुळे यापुढे मी कॉफी आणि चहाला नकार दिला, आश्चर्य वाटून घेऊ नका. माझे शरीर सर्व “तामसिक” गोष्टी नाकारत आहे. त्यामुळे मी अधिकृतपणे, आतापासून क्रूरतामुक्त झाले आहे. फक्त काही खोटं बोलणाऱ्या आणि फसवणाऱ्या लोकांना वगळता,” अशी पोस्ट प्राजक्ता माळीने केली आहे.
प्राजक्ता माळीने वाढदिवशी पोस्ट करून सांगितला मोठा निर्णय
प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचं कौतुकही केलं आहे.
व्हिगन म्हणजे काय?
What is Vegan Lifestyle: व्हिगन म्हणजे अशी जीवनशैली किंवा आहारपद्धती, ज्यामध्ये कोणत्याही प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला जातो. व्हिगन होणं हा फक्त आहाराचा नियम नसून प्राण्यांना इजा न पोहोचवता पूर्णपणे वनस्पतींवर आधारित जीवनशैली स्वीकारणं आहे. अगदी दुध, दही, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांपासून ते चामडे, लोकर किंवा रेशीम यांसारख्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर व्हिगन लोक करत नाहीत.
व्हिगन झालेले इतर सेलिब्रिटी
बरेच बॉलीवूड कलाकार व्हिगन झाले आहेत. रिचा चड्ढा, रितेश देशमुख व त्याची पत्नी जिनिलीया देशमुख, बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, ईशा गुप्ता, सोनाक्षी सिन्हा, मल्लिका शेरावत, आमिर खान, अनुष्का शर्मा, निक्की तांबोळी हे व्हिगन आहार घेतात.
