Marathi Actress Prarthana Behere Emotional : १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं निधन झालं होतं. एका रस्ते अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले होते. याबद्दल अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. अशातच आता तिनं पुन्हा बाबांची आठवण सांगितली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या सिनेमातून प्रार्थना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा तिनं तिच्या वडिलांसाठीच केला आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्री मुलाखती देत आहे. अशातच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिनं वडिलांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.

याबद्दल प्रार्थना म्हणाली, “सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान माझे बाबा वारले. दोन दिवसांची सुट्टी होती आणि ते बडोद्याला गेले. तिथे अपघात झाल्याचं वृत्त आलं. तेव्हा मी केदार सरांना लगेच कॉल करून सांगितलं. त्यावर तेसुद्धा ‘हो! हो! जा… इथली काही काळजी करू नकोस. फक्त मला कळव.’ निर्मिती ताईंनीसुद्धा मला काळजी करू नको, असं म्हटलं होतं. मग मी तिथे गेले आणि दोन दिवसांनी कळलं की, बाबा आता या जगात नाहीयत. तेव्हा मला भीती वाटत होती की, आता सिनेमाचं शूट सुरू आहे. यात खूप साऱ्या गोष्टींची गुंतवणूक असते. माझा नवरासुद्धा एक निर्माता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. यात बरीच आर्थिक गुंतवणूक असते. अशावेळी माझ्यासाठी सगळे कसे थांबणार, निर्मिती ताईंच्या इतर कामाच्या तारखा असतील, पुढे कसं होणार असे अनेक विचार माझ्या डोक्यात होते. पण केदार सरांनी तेव्हा कॉलवर ‘मला तू काहीही चिंता करू नकोस आणि तू जेव्हा यातून बाहेर येशील. तेव्हाच आपण शूटिंग सुरू करू’ इतकंच म्हणाले. यामुळे एक भावनिक आधार मिळाला.”

यापुढे ती म्हणाली, “त्याचदरम्यान मला सना शिंदेनंसुद्धा केला होता. तेव्हा मी तिला म्हणालेली, ‘सना हा सिनेमा तू तुझ्या बाबांसाठी करत आहेस, तसंच मीसुद्धा हा सिनेमा माझ्या बाबांसाठी करतेय.’ मग १३ दिवसांनी मी सेटवर गेले. पुन्हा शूटिंगला सुरूवात केल्यानंतर माझ्यासाठी त्या परिस्थितीशी जुळवून घेणं जरा कठीण गेलं होतं; पण मला या सर्वानी खूप सांभाळून घेतलं. तेव्हा मी खूप रडायचे. पण या सगळ्यात केदार शिंदे, निर्मिती शिंदे आणि सगळी मंडळी माझ्याबरोबर होती.”

दरम्यान, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं असून यात सासू-सुनेच्या भूमिकांत अभिनेत्री निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे या दोघी आहेत. तर नकुल घाणेकर आणि राजन भिसे या कलाकारांच्याही सिनेमात मुख्य भूमिका आहेत.