Priya Bapat Shares Fitness Journey: मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या अभिनय आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत आलं होतं. त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अशातच आता तिने या ट्रान्सफॉर्मेशनचं सीक्रेट सांगितलं आहे.

नव्या वर्षाची सुरुवात होताच प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी जिममधले फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. त्यांचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण थक्कच झाले. अनेकांना हे फोटो AI ने बनवलेले आहेत की काय असंही वाटलं. पण हे फोटो खरेखुरे आहेत. दोघांनी नव्या वर्षात हे ट्रान्सफॉर्मेशन केलं असून आता प्रियाने स्वत:च या फोटोंमधील ट्रान्सफॉर्मेशनचं गुपित सांगितलं आहे.

“”फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी अनेक दिवस प्रयत्न करावे लागतात. पण शेवटी त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसतात,” असे प्रिया आपल्या फिटनेस प्रवासाबद्दल सांगते. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं तिच्या फिटनेसच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला.

प्रिया सध्या तिच्या एका मराठी वेबसीरिजचे शूट पूर्ण करत आहे. मात्र आगामी भूमिकेसाठी ती फिटनेसवर खूप मेहनत घेत असल्याचे ती सांगते. “सध्याच्या भूमिकेसाठी मला जसे आहे तसेच राहणे गरजेचे होते. पण जानेवारीच्या शेवटी सुरू होणाऱ्या पुढील प्रोजेक्टसाठी ही मेहनत नक्कीच कामी येईल, कारण ती भूमिका तशीच आहे. मला फक्त त्या व्यक्तिरेखेत फिट बसायचं आहे. खरंतर मला अनेक अ‍ॅक्शन रोल्स करायची इच्छा आहे,” असे ती म्हणते.

जिममध्ये सातत्याने जाण्याचे श्रेय प्रिया तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कामतला देते. “गेल्या दहा वर्षांपासून मी नियमित वर्कआउट करते, त्याचं पूर्ण श्रेय माझ्या फिटनेसवेड्या नवऱ्याला जातं,” असे ती सांगते. अ‍ॅब्सवर काम करण्याबद्दल ती म्हणते, “अ‍ॅब्स दाखवण्याचा विचार कधीच केला नव्हता. पण अ‍ॅब्स दिसायला लागल्यावर फिटनेससाठी अजून जास्त प्रेरणा मिळते. शरीर लगेच बदलत नसेल तर निराश होऊ नये, कारण यासाठी वेळ लागतो. यात शॉर्टकट नसतात.”

आपल्या फिटनेस रुटीनबद्दल प्रिया म्हणते, “याआधी दोन वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी मी सुमारे १० किलो वजन वाढवलं होतं आणि नंतर ते कमीही केलं. पण यावेळी यावेळी मला माझ्या स्नायूंवर काम करावं लागलं आणि अ‍ॅब्सही परफेक्ट शेपमध्ये आणावे लागले.” यानंतर तिनं स्क्रीनवर फिट दिसणं एक नवीन अनुभव असल्याचंदेखील सांगितलं. अ‍ॅब्सही परफेक्ट शेपमध्ये आणावे लागले.

प्रिया म्हणाली, “जेव्हा फोटोशूट करण्याचा विचार केला, तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती. ती म्हणजे मी चांगली आणि आनंदी दिसायला हवी. एक अभिनेत्री म्हणून मला हे खूप महत्त्वाचं वाटलं. अभिनय म्हणजे फक्त संवाद बोलणं नाही, तर यात शारीरिक आणि मानसिक तयारीही तितकीच गरजेची असते. आव्हाने स्वीकारणं, वेगळं दिसणं आणि भूमिकेसाठी गरज असेल तर शारीरिक बदल करणं हे कलाकाराने शिकायलाच हवं.”