Marathi Actress On Vikram Gokhale : मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विक्रम गोखले. २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विक्रम गोखलेंच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. निधनानंतर अनेकांनी त्यांच्याबद्दलच्या दु:खद पोस्ट शेअर केल्या होत्या. तसेच आजही अनेक मराठी कलाकार त्यांच्या आठवणीत भावुक होताना दिसतात. अशातच मराठी अभिनेत्री रीना मधुकरने विक्रम गोखले यांच्या आठवणीत भावुक प्रतिक्रिया दिली आहे
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रीना विक्रम गोखलेंच्या आठवणी सांगताना असं म्हणाली, “माझा ‘सूर लागू दे’ हा चित्रपट काही कारणास्तव अडकला होता. त्यानंतर आम्ही त्याचे पुन्हा शूटिंग केले. त्याच वेळी माझी ‘मन उडू उडू झालं’ मालिकासुद्धा सुरू होती. ‘सूर लागू दे’चं पुन्हा गुजरातमध्ये शूटिंग सुरू केलं होतं. तेव्हा विक्रमकाकासुद्धा त्या शूटिंगला होते. तेव्हाचे त्यांचे शेवटचे दिवस मला आठवतात.”
“त्यांना चालताही येत नव्हतं अन् बसल्यानंतर…” – रीना मधुकर
त्यांना अक्षरश: चालताही येत नव्हतं. ते बसल्यानंतर त्यांचा पाय उचलून बाजूला ठेवावा लागत होता. त्यांच्या पोटात एक द्रव्य तयार व्हायचं, जे हॉस्पिटलमध्ये जाऊन काढावं लागायचं. अशा परिस्थितीतसुद्धा ते त्यांचं काम करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की, मला माझं कुठलही काम अर्धवट ठेवायचं नाहीय. त्यामुळेच ते ‘सूर लागू दे’ चित्रपट पूर्ण करण्यासाठी आले होते”, असेही पुढे रीनाने सांगितले.
“तुझ्या चित्रपटात मी पैसे न घेता काम करेन” – रीना मधुकर
त्यानंतर रीना म्हणाली, “त्या चित्रपटाचं त्यांचं शूटिंग पूर्ण झालं आणि ते निघाले. तर त्यांना सोडण्यासाठी आम्ही सगळे जमले होतो. मीसुद्धा त्यांना निरोप देताना पाया पडले. तेव्हा जाता जाता त्यांनी मला असं म्हटलं की, तू एखाद्या चित्रपटाची निर्मिती कर. मी त्यात पैसे न घेता काम करेन. हे त्यांचे शेवटचे शब्द होते.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “माझ्या डोक्यात निर्माती वगैरे व्हायचं, असं काहीच नव्हतं. तेव्हा माझी ‘मन उडू उडू झालं’ मालिका छान सुरू होती. मी पुढे तेच करायचं असं ठरवलेलं. बाकी माझ्या डोक्यात काहीच नव्हतं; पण ते मला म्हणाले होते की, तू निर्मिती कर, मी त्यात फुकटात काम करेन. ते माझ्या डोक्यात कायम राहिलं आहे; पण दुर्दैवानं पुढे आमची भेटच झाली नाही. पण, त्यांचा आशीर्वाद अजूनही आहे. त्यांच्यामुळेच मी आजवरचा प्रवास करू शकली आहे.”
