Rinku Rajguru Shares Kedarnath Experience : अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली दहा वर्ष सिनेइंडस्ट्रीत काम करतेय. ‘सैराट’ सिनेमानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. अभिनयानं चर्चेत राहणारी रिंकू सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियाबर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो-व्हिडिओ शेअर करीत असते.
विविध विषयांवर रिंकू तिची मतं अगदी स्पष्टपणे मांडताना दिसते. अशातच एका मुलाखतीत तिने तिची आध्यात्मिक बाजू सांगितली. यावेळी रिंकूने आधी नास्तिक असल्याचं कबूल केलं. तसंच काही घटनांमुळे ती अध्यात्माकडे वळली असल्याचंसुद्धा सांगितलं. तसंच तिनं तिचा केदारनाथचा अनोखा अनुभवसुद्धा शेअर केला.
माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि…
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूला तिच्या आध्यात्मिक बाजूविषयी विचारण्यात आलं. याबद्दल ती म्हणाली, “मी आधी नास्तिक होते. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. मग मी उपवास वगैरे करत गेले आणि मला त्याचे काही अनुभवही आले. खरंतर मी आता खूप त्या गोष्टींकडे वळले. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव यामागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. पण एक कुठली तरी शक्ती आहे. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो किंवा मानायला लागतो. माझ्याबाबतीतही असंच झालं. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि मग मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटलं की आता इथेच एक ती आशा आहे आणि शांतता आहे. मला घरात सकाळी देवपूजा, जप करायला आवडतं. त्यामुळे मी स्वत:साठी ते करते.”
रिंकू राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव
यापुढे रिंकूने तिचा केदारनाथला जाण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “माझा अनुभव हा कधीही न विसरण्यासारखा आहे. मला अचानक वाटलं की, मला केदारनाथला जायचं आणि मी गेली. गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी मी चालत गेले. खुप थकले होते, रडलेसुद्धा. मी दर्शन घेतलं आणि मला असं वाटलं की जाताना निदान मला हेलिकॉप्टर तरी मिळूदे. कारण पुढच्या दिवशी आमचं फ्लाइटसुद्धा होतं. आम्हाला एक माणूस म्हणाला की हेलिकॉप्टर मिळेल. आम्ही दोन-तीन तास थांबलो. वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदे. मी माझं कुटुंबासह दर्शनाला येईन.”
त्रासात मी देवाला म्हणाले की, हा काय देव आहे
यापुढे तिने सांगितलं, “नंतर एक माणूस आला आणि म्हणाला की आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते. चिडली होते. त्या त्रासात मी देवाला म्हणाले की ‘हा काय देव आहे… काय ऐकतोय का… हेलिकॉप्टर पाहिजे म्हणाले पण तेही करत नाहीय…’ असं बोलत-बोलत पुढे जात होते, तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने हेलिकॉप्टरबद्दल विचारलं. तो म्हणाला फक्त दोनच सीट आहेत. त्यानंतर मी आनंदात पळत पळत जात होते आणि इतक्यात जोरात पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं की मी आता पुढे कधीच काहीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथेच शिक्षा मिळाली.”
शेवटी रिंकू म्हणाली, “आता हे कसं झालं काय झालं माहीत नाही. कारण खूप लोक वाट बघत होते आणि त्यापैकी फक्त आम्ही दोघीच त्या हेलिकॉप्टरमधून गेलो. म्हणून माझा विश्वास बसला की, ती एक शक्ती आहे.” दरम्यान रिंकूचा नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधवही आहे.
