अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचं नाव मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. संस्कृतीदेखील खूप आपुलकीने चाहत्यांशी संवाद साधते. मात्र काही महिन्यांपूर्वी तिला चाहत्याचा एक विचित्र अनुभव आला, जो तिने आता शेअर केला आहे. संस्कृतीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय याचे अपडेट्स ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून देत असते. पण एका चाहत्याचा तिला इतका त्रास झाला की तिने त्याची थेट पोलिसात तक्रार केली होती. नुकतीच तिने 'लोकमत'ला एक मुलाखत दिली त्या वेळी तिने याबद्दल भाष्य केलं आहे. आणखी वाचा : ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध! सायली संजीव नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुम्हा दोघांसाठी…” ती म्हणाली, "कधी कधी तू माझी बायको आहेस, तू माझी गर्लफ्रेण्ड आहेस, असे फॅन्सचे मेसेजेस येतात. पण मी त्यांना गांभीर्याने घेत नाही, कारण हे त्यांना वाटणारं आकर्षण असतं किंवा मी साकारलेल्या एखाद्या भूमिकेला मनात ठेवून ते असं बोलत असतात. असा माझा एक चाहता होता, जो मला असे मेसेज करायचा. मी कधीही त्याचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही. एकदा त्याचा मला फोन आला आणि मी त्याला समजावलं की या नंबरवर फोन करू नकोस आणि त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर त्याने माझ्या हेअर ड्रेसरचा नंबर मिळवला आणि ती माझ्याबरोबर काम करत असताना त्याने तिला फोन केला. मला हे कळल्यावर मी तिला सांगितलं, तो नंबर ब्लॉक कर." हेही वाचा : “हे तर बेकायदेशीर आहे…” संस्कृती बालगुडेच्या फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत पुढे ती म्हणाली, "दीड-दोन वर्षांपूर्वी मी पुण्यात माझ्या एका दिग्दर्शक मित्राबरोबर नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. मी कुठे आहे याची मी स्टोरी इन्स्टाग्रामवर लोकेशनचा एक फोटो शेअर करत टाकली. थोड्या वेळाने तोच माझा चाहता थेट माझ्यासमोरच आला. तो आला तेव्हा त्याचे हात मागे होते. त्याला पाहून माझी धडधड वाढली. त्याने मला थेट विचारलं की, 'तू का केलंस असं?' अशा प्रसंगामध्ये आपण नकारात्मक विचार करायला लागतो. मला वाटलं ॲसिड अटॅक वगैरे होतो की काय. पण माझ्या मित्राने हळूच मागे पाहिलं तर त्याच्या हातात काही नव्हतं. मग माझा मित्र त्याला बाहेर घेऊन गेला. हाच माझा चाहता त्यानंतर दोन वेळा माझ्या घरी आला. त्यानंतर मात्र आम्ही त्याची पोलिसात तक्रार केली, त्याला पोलिसांकडे नेलं. नंतर कळलं की त्याचे आई-वडील परदेशात असतात. त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर काहीतरी परिणाम झाला असावा, असंच म्हणावं लागेल. मी असं केलं कारण शेवटी आपली सुरक्षा महत्त्वाची आहे."