बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबर अभिनेत्री रिंकू राजगुरु झळकणार आहे. नुकतंच अभिनेत्री सायली संजीवने रिंकू राजगुरुबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. झिम्मा २ या चित्रपटाच्या निमित्ताने सायली संजीवने 'टीओडी मराठी न्यूज' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला रिंकूबरोबर काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला. त्यावेळी "रिंकूने मला ती झिम्मा २ मध्ये काम करते, याचा थांगपत्ताही लागू दिला नाही", असे सायलीने म्हटले.आणखी वाचा : “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित "शिवानी आणि मी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे ती येतेय म्हणजे मला माझी एक मैत्रीण येते, असंच वाटत होतं. रिंकूबरोबर मी एक चित्रपट करणार होते. पण काही कारणांनी तो चित्रपट झाला नाही. त्यानंतर आता झिम्मा २ चित्रपटाच्या रिहर्सल आणि वर्कशॉपदरम्यान आम्ही आठ-दहा दिवस एकत्र होतो. त्या दिवसात या शहाण्या मुलीने ती या चित्रपटात आहे, हे मला कळूच दिलं नाही. ती झिम्मा २ चित्रपटात आहे, याचा तिने मला थांगपत्ताही लागू दिला नाही. त्यानंतर एकदा अचानक मी हेमंत आणि रिंकू भेटलो होतो. तेव्हा हेमंत आणि रिंकूचं काहीतरी बोलणं सुरु होतं. त्यावेळी मी तुम्ही काय बोलताय, असं म्हणून विचारण्यासाठी गेले आणि त्यावेळी ही आहे, असं आश्चर्यचकित होत मी विचारलं. त्या मुलीने मला आठ-दहा दिवसात ती या चित्रपटात काम करतेय, हे सांगितलंही नाही. पण त्या काळात माझी आणि तिची फार चांगली मैत्री झाली", असा किस्सा सायली संजीवने सांगितला. आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित दरम्यान हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटानंतर याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहेत.