Sonalee Kulkarni On Losing Work Due To Age : मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांना रंगामुळे आणि दिसण्यामुळे मिळालेलं काम गमवाव लागलं आहे. याबद्दलचे विविध अनुभव कलाकारांनी सांगितले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं वयामुळे हिंदीतलं काम गेल्याचा एक अनुभव सांगितला. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं हा कटू अनुभव शेअर केला.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “मी नुकताच ओटीटीवरील एक शो साईन केला होता. त्या लेखक-दिग्दर्शक आणि पूर्ण टीमला भेटले. जशी मी आता दिसतेय तशीच मी अगदी साधा मेकअप करून त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी मला त्या भूमिकेची माहिती दिली होती. त्यांनी मला भूमिकेबद्दल सांगितलं होतं की ती अमुक-अमुक वयोगटाची आहे, ती अशी दिसते, तिची पार्श्वभूमी अशी असेल वगैरे वगैरे… साधारण माझ्याच वयाची ती भूमिका होती. त्यामुळे त्या भूमिकेची एक साधारण तयारी करून त्यांना भेटायला गेले होते. जेणेकरून त्यांना आपण त्या भूमिकेत कसे दिसू याचा अंदाज येईल. आम्ही वाचन केलं. माझ्या भूमिकेबद्दल आणि शोबद्दल त्यांनी मला सांगितलं. क्रिएटिव्ह चर्चाही झाली. दोन तास आम्ही त्यावर बोलत होतो. सगळं ठरलंच होतं. फी-तारखांबद्दलसुद्धा चर्चा झाली. त्यांनी मला स्क्रिप्ट (संहिता) पाठवली. त्यावर मी अभ्यास सुरू केला. नंतर पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू करू, या विचारात मी होते. इतक्यात ‘तिघी’चा टीझर आला. त्यानंतर मला त्यांच्याकडून निरोप आला की, ‘मॅम आम्ही एक वेगळी मुलगी घेतोय.”

वयाने मोठी दिसतेय म्हणून काम नाकारलं : सोनाली कुलकर्णी

यापुढे सोनालीनं सांगितलं, “चॅनलचा हा निर्णय आहे. चॅनेलला एक वेगळी हिंदीतली आणि तुमच्यापेक्षा लोकप्रिय मुलगी हवी आहे’ असं ते म्हणाले. त्यावर मी त्यांना ‘ओके’ म्हटलं आणि मला यामागचे नेमके निकष कळतील का? म्हणजे पुढच्यावेळी मी तयारीत जाईन असं विचारलं. त्यावर ते ‘सोशल मीडिया फॉलोअर्स आणि लोकप्रियता या गोष्टी आहेतच. पण तू आता वयाने मोठी दिसत आहेस’, असं म्हणाले. त्यावर मी त्यांना सांगितलं, ‘वयाने मोठी म्हणजे? भूमिकेच्या वयाची जी अपेक्षा आहे, त्या वयातच मी आता आहे आणि या वयात असंच दिसतात. बरं, मला तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेटलात तेव्हा तुम्हाला हे जाणवलं नाही. मग आता अचानक तुम्हाला वय कसं दिसलं?’ त्यावर ते म्हणाले, ‘आम्हाला ‘तिघी’च्या टीझरमध्ये स्क्रीनवर तसं दिसतंय.’ मग मी म्हटलं ‘त्या भूमिकेची ती गरज आहे म्हणून मी तशी दिसतेय. तुम्हाला हवं तर तुम्ही लुक टेस्ट करा आणि मग ठरवा की, तुम्हाला हव्या असलेल्या भूमिकेप्रमाणे दिसतेय की नाही.’ मग ते म्हणाले ‘आम्ही चॅनेलशी भांडू शकत नाही.’ मग मी म्हटलं ‘ठीक आहे, मलासुद्धा काही सिद्ध करायचं नाही. मला भांडायचं नाही. तुम्हाला मी योग्य वाटत नसेल; तर चर्चा इथेच संपली. पण मला कळायला हवं की, नक्की प्रॉब्लेम आहे’.”

मला माझं वय आहे ते स्वीकारायचं आहे : सोनाली कुलकर्णी

यापुढे सोनाली म्हणाली, “यामुळे मी माझ्यावर शंका घ्यायला लागले. मी ‘तिघी’ सिनेमासाठी हवी तशी स्क्रीनवर आले. कुठल्याही फिल्टर आणि फिलर्सशिवाय काम केलं. आता माझी कामं जाणार का? या विचारात माझे काही दिवस गेले. मग मला काही लोकांनी सांगितलं, अनेकांनी आता फिलर्स केले आहेत. तू पण हे कर. मग मी म्हटलं त्याने मला काम मिळणार आहे का? कदाचित मिळूही शकतील. माहीत नाही. मग मी विचार केला की, मला यात कृत्रिम पद्धतीच्या सौंदर्यात अडकायचं आहे का? फिलर्स केलं तर मला ते सतत करावं लागेल आणि मी यात अडकले तर सगळं भीषण होत जाणार. त्यापेक्षा मला माझं वय स्वीकारायचं आहे. बाकीचे सगळे फिलर्स करतायत आणि आपणसुद्धा त्यातले भाग आहोत तर मलाही ते करायचं आहे हे प्रेशर नको आहे. सगळे करतायत म्हणून मी नाही करणार. मला ते पटतंय का? प्रत्येकाचा स्वत:चा विचार आहे. ज्यांना ते पटतं त्यांनी ते करावं. तुमचं शरीर आहे, तर निर्णयही तुमचाच असायला हवा.”

पिंपल्समुळे अनेक भूमिका त्यामुळे गेल्या : सोनाली कुलकर्णी

शेवटी सोनाली असं म्हणाली, “मग मी ठरवलं की, मी हे काही करणार नाही. आता काही भूमिका गेल्या तरी चालेल; पण मला पुढे आयुष्यभर मी जशी आहे तसंच मला स्वीकारायचं आहे. मला ती माझी एक जबाबदारीसुद्धा वाटते. माझ्याकडे बघणाऱ्या काही मुलींना सांगायचं आहे की, तुम्ही स्वत:ला स्वीकारलं नाही तर तुम्हाला कुणीच स्वीकारणार नाहीत. आताच्या अनेक मुली स्वत:च्या सौंदर्याबद्दल खुप विचार करताना दिसतात. अनेकांना कोरियन त्वचेविषयी आकर्षण आहे. पण आपण कोरियन नाही आहोत. आपण कोरियन क्रीम लावून कोरियन अजिबातच दिसणार नाही. आपण भारतीय आहोत. आपण ज्या वातावरणात राहतोय, खातोय-पितोय, जगतोय तसेच आपण दिसणार आहोत. चेहऱ्यावरील पिंपल्समुळे अनेक मुली डिप्रेशनमध्ये जातात. मान्य आहे डिप्रेशन येतं. मलासुद्धा डिप्रेशन आलं होतं. माझ्याही अनेक भूमिका त्यामुळे गेल्या. पण नंतर मला कळलं की, हे मान्य करून पुढे जाऊया. लोकांना ही सवय लावायला हवी की, दिसण्याच्या पलीकडे जायला हवं? पुढे जाण्यासाठी आणि तशी चर्चा सुरू होण्यासाठी तसं काम करावं लागेल आणि लोकांचा दृष्टिकोन बदलावा लागेल. मी आता त्या सगळ्या परिस्थितीतून गेले आहे.”