Sonali Kulkarni Recalls 18th Birthday: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर स्वप्नील जोशीदेखील प्रमुख भूमिकेत दिसला होता. आता मात्र अभिनेत्री तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

आधी ४०० रुपये…

सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने माझा १८ वा वाढदिवस कायम लक्षात राहील असे वक्तव्य केले. तसेच त्याचे कारणदेखील सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “पुण्यात मी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना पाच वर्षे नृत्यशिक्षिका म्हणून काम केलं. माझ्या घरी मला कधी पॉकेटमनी मिळाला नाही, पण बालकल्याणचा पगार हा माझा पॉकेटमनी असायचा.”

“माझं वय कमी होतं म्हणून मला निम्मा पगार मिळायचा. मी १८ वर्षांची झाले तेव्हा बालकल्याणमध्ये येणाऱ्या सर्व अंध, अपंग, मूकबधिर अशा मुलांबरोबर माझा १८ वा वाढदिवस साजरा झाला होता; असं भाग्य फार कमी जणांच्या वाट्याला येतं.”

“माझा १८ वा वाढदिवस माझ्या खूप लक्षात राहील, कारण त्यानंतर मला पूर्ण पगार मिळायला लागला. आधी ४०० रुपये मिळायचा, मग ८०० रुपये मिळायला लागला”, अशी आठवण अभिनेत्रीने सांगितली.

सोनाली कुलकर्णीचे काही दिवसांपूर्वीच ‘सो कुल…टेक २’ हे पुस्तक प्रदर्शित झाले. या पुस्तकामुळेदेखील अभिनेत्रीची मोठी चर्चा झाली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेदेखील या सोहळ्याला उपस्थित होती.

याच मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने पुस्तकांबद्दलदेखील वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली की, मी लहान असताना माझ्या घरी ८०-१०० पुस्तके होती. मला तेव्हा असं वाटायचं की आपल्याकडे किती पुस्तकं आहेत. ही इतकी पुस्तकं कधी वाचून होणार? आता त्याच्या किती तरी पटीने जास्त पुस्तकं माझ्या घरात आहेत. आता असं वाटत राहतं की एखाद्या गोष्टीची श्रीमंती कधीच कमी होत नाही, ती वाढतच राहते. ती परंपरा मी माझ्या आई-बाबांकडून घेतली आहे. माझ्या कुटुंबाबरोबरच मला चांगले शिक्षक मिळाले. माझ्या शाळेत वातावरण खूप चांगलं होतं; जेणेकरून मुलांना आपल्या शहराची, राज्याची, देशाची ओळख व्हावी असा प्रयत्न करणारे शिक्षक होते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.