महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. काल मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू केला; जो अजूनही सुरुच आहे. मनसैनिक मोठ-मोठे केक घेऊन राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण राज ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत. मराठी कलाकार मंडळींनी देखील राज ठाकरेंना खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता सिद्धार्थ जाधव, दिग्दर्शक विजू माने यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील राज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा- “हा हिरो प्रत्यक्षात येऊन माझा तारणहार बनू शकेल का?” विजू मानेंची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाले, “तो दिवस लवकर येवो”

तेजस्विनीने राज ठाकरेंबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता!”

पुढे अभिनेत्रीनं लिहिलं, “साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकांविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेण-देण पण नाही, किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत राहा. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन! हसत राहा साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

हेही वाचा – Video: “बाल अत्याचाराला खतपाणी…”,’पारू’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “निव्वळ फालतूपणा”

तेजस्विनीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “खरा नायक! माननीय राज साहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”, “राज साहेबांमध्ये बाळासाहेबांचा भास होतो”, “तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो आदरणीय राजसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा”, अशा अनेक प्रतिक्रिया तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर दिल्या आहेत.