Vandana Gupte Navi Mumbai Airport Signboard Controversy: मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या नेहमी परखडपणे त्यांची मते मांडत असतात. त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींबाबत त्या स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत असतात. आता वंदना गुप्ते यांनी नवी मुंबई एअरपोर्टवर जाताना दिशादर्शक बोर्ड नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी पैसे नसतील तर मी लावून देते, असे म्हणत गैरसोईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांना नवी मुंबईच्या एअरपोर्टच्या दिशेने प्रवास करताना वाईट अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत त्यांनी पूर्ण रस्त्यावर विमानतळावर जाण्यासाठी कोणताही दिशादर्शक बोर्ड नसल्याने गैरसोय झाल्याचे सांगितले आहे. वंदना गुप्ते म्हणाल्या, “मी आता मुंबई-कोल्हापूर असा प्रवास करण्यासाठी नवी मुंबई एअरपोर्टवर जायला निघाले आहे. मी शिवाजी पार्कला राहते. तिथून मी ‘अटल सेतू: घेऊन आले, तर विमानतळावर जाण्यासाठी इथे कुठेही दिशा दाखवणारे फलक नाहीत किंवा कोणतीही खूण नाही.”
रस्त्यावर एकही एअरपोर्टची खूण का नाहीये – वंदना गुप्ते
पुढे त्या म्हणाल्या, “पुणे किंवा गोव्याला जाण्याच्या दृष्टीने मोठेमोठे फलक लावलेले आहेत; पण हा रस्ता विमानतळाकडे जातो, अशी दाखवणारी कोणतीही खूण नाहीये. आम्ही अंदाज घेत घेत चाललो आहोत आणि माझ्या ड्रायव्हरला असे वाटत आहे की, तो बरोबर चालला आहे; पण मला अजूनही कळत नाहीये. एकाही बोर्डवर साधं विमानाचं चित्रसुद्धा नाहीये. सगळीकडे पुणे-बंगळुरू रोड आणि एमएमआरडी रोड असेच लिहिले आहे. या रस्त्यावर एकही एअरपोर्टची खूण का नाहीये हे माहीत नाही.”
एअरपोर्टवाल्यांना जर खर्च झेपत नसेल, तर मी करते – वंदना गुप्ते
वंदना गुप्ते या विमानतळ प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त म्हणाल्या, “हाच रस्ता जर विमानतळाकडे जाणारा असेल, तर त्यावर लवकरात लवकर दिशादर्शक फलक नावा. नाही तर मला सांगा कुठे लावायचे आहेत ते मी खर्च करते. एअरपोर्टवाल्यांना जर खर्च झेपत नसेल, तर मी माझ्या पैशांनी खर्च करते आणि बोर्ड लावून देते.”
हे खूपच गोंधळात टाकणारे – वंदना गुप्ते
आणखी एक व्हिडीओ शेअर करत वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, “आता पुढे एकच बोर्ड दाखवला होता, त्यामध्ये छोटासा रस्ता दाखवण्यात आला होता; पण आमचा ड्रायव्हर म्हणतोय की, तो रस्ता नाहीये. आता माहिती नाही, आम्ही कुठे चाललो आहोत, दुसऱ्या एका हायवेच्या जवळून चाललोय. काहीच कळत नाहीये आणि हे खूपच गोंधळात टाकणारे आहे. तसेच आता टर्मिनल १चे काम सुरू करत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा फ्लाईट इकडे वळवल्या आहेत. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर या सगळ्याचा विचार करा.”
पुढे वंदना गुप्ते यांनी रस्त्यावर असणारा एक बोर्ड व्हिडीओमध्ये दाखवत म्हणाल्या, “आताशी मला हा पहिला फलक दिसला. इतक्या वेळानंतर नवी मुंबई विमानतळ लिहिलेला हा पहिलाच बोर्ड दिसला आहे. त्यामुळे हे असं सुरू आहे. यावर काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करा.”
दरम्यान, वंदना गुप्ते या सध्या ‘कुटुंब किरर्तन’ या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग करत आहेत.
