Marathi Actor Shares His Brain Hemorrhage Struggle : ‘कॉमेडी एक्सप्रेस’, ‘फु बाई फु’ यांसारख्या विनोदी शो आणि नाटक-सिनेमांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे विकास समुद्रे. विकास यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं. मात्र, काही वर्षांपूर्वी या अभिनेत्याविषयी आलेल्या एका वृत्ताने अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. २०१८ मध्ये विकास समुद्रे यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. याच आजाराबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विकास यांनी ब्रेन हॅमरेजबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “१४ जानेवारी २०१७ रोजी मला ब्रेन हॅमरेज झालं. ते का झालं हे अजूनपर्यंत डॉक्टरांना कळलं नाही. त्या काळात माझं डोकं दुखत होतं आणि तेव्हा मी घरी काहीच सांगितलं नाही. डोकेदुखीमुळे मी दिवसाला ८-१० गोळ्या खायचो. तेव्हा माझ्या डोक्यात हा विचारच आला नाही की, आपण सिटीस्कॅन वगैरे करावं. मग एकेदिवशी मी कोसळलोच.”
माझ्या उपचारांसाठी फंड्सद्वारे पैसे जमा केले गेले : विकास समुद्रे
यापुढे त्यांनी सांगितलं, “मला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी रविवार असल्याने डॉक्टर नव्हते. पण ठाण्याच्या एका डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. तेव्हा असे आणखी दोन पेशंट होते, ते दोघे दगावले आणि मी वाचलो. त्या डॉक्टरांना माहीत नव्हतं मी कोण आहे. काही दिवसांनी त्यांनी वर्तमानपत्रात स्वत:चं नाव वाचलं. माझ्यावरील उपचाराची बातमी त्या वर्तमानपत्रात होती. त्या काळात मला बघायला अनेक लोक येऊन गेले. पण मी शुद्धीत नसल्याने मला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा माझ्यावरील उपचारांसाठी फंड्सद्वारे पैसे जमा केले गेले. माझ्या पत्नीनं तेव्हा खूप धावपळ केली. जीवाचं रान करून तिनं २०-२२ लाख जमवले आणि त्यात माझं ऑपरेशन झालं.”
माझ्यामुळे मोठे झाले ते बघायलाही आले नाहीत : विकास समुद्रे
यापुढे ते म्हणाले, “त्याकाळात माझ्यामुळे जे लोक मोठे झाले. ज्यांना मी संधी दिली. ज्यांना मी लोकप्रिय केलं; ते बघायलासुद्धा आले नाहीत. आज या घटनेला नऊ वर्षे झालीत, माझ्या या आजाराबद्दल त्यांनी आजतागायत मला विचारलं नाही. पण ठीक आहे. यामुळे आपलं कोण; परकं कोण ते कळलं. अनेक ग्रुप्समध्ये माझ्या निधनाच्या बातम्यासुद्धा आल्या. माझे अनेक फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. आजही वाढदिवसाला वगैरे माझे ते जुने फोटोच शेअर केले जातात, तर कसं कुणी काम देईल. उलट मी आता बरा आहे, ठणठणीत असल्याचे फोटो शेअर केले जावेत ना. पण हे होत नाही. अजूनही अशा काही गोष्टी सुरू आहेत. पण सध्या जे सुरू आहे त्याचा मला आनंद आहे. माझ्या या कठीण काळात बायकोची खूप भक्कम साथ मिळाली.”
डॉक्टरांनी कवटीचा एक भाग काढून दिला अन्…: विकास समुद्रे
शेवटी त्यांनी सांगितलं, “डॉक्टरांनी माझ्या कवटीचा एक भाग काढून मला दिला आणि सांगितलं की हे तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा. त्यानंतर आठ महिने तिजोरीत तो तुकडा होता. त्यांनी त्वचा शिवली होती आणि त्यावर पुन्हा केस आले होते. मग आठ महिन्यांनी त्यांनी पुन्हा तो कवठीचा तुकडा लावला. कुणालाच माहीत नव्हतं की मला ब्रेन हॅमरेज झालं होतं. मी पाचव्या-सहाव्या दिवशी स्वत:च नाश्ता वगैरे करत होता. काही काळानंतर गोळ्यासुद्धा बंद केल्या.”
