Kshitij Patwardhan Post FoR Abhinay Berde : लेखक, कवी व गीतकार म्हणून लोकप्रिय असलेला क्षितिज पटवर्धन ‘उत्तर’ या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. क्षितिजचं हे सिनेमातलं पदार्पण आहे. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय मुख्य भूमिकेत आहे. याच अभिनयसाठी क्षितिजनं एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ सिनेमा आणि त्यातील अभिनय बेर्डेच्या अभिनयचं सर्वत्र कौतुक होत आहे. याचदरम्यान क्षितिजनं शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये क्षितिज म्हणतो, “सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत थांबलो होतो… अभिनयला मी कास्ट केलं तेव्हा भुवया खूप उंचावल्या होत्या. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीसुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर त्याला टार्गेट केलं (ज्यात आमच्या क्षेत्रातलेसुद्धा लोक होते.) ‘अभिनय’ शब्दावर कोटी करून तुला हे जमत नाही, ते जमत नाही वगैरे बडबड केली; पण आम्ही दोघेही शांत राहिलो.”
त्यानंतर क्षितिज म्हणाला, “दहा महिने फक्त निनाद (‘उत्तर’मधील पात्र) कसा असेल, कसा बोलेल, बघेल, वागेल यावर काम केलं, त्यानं कठोर मेहनत घेऊन १२-१३ किलो वजन कमी केलं आणि हाऊसफुल गर्दीतून ‘नन्या सुपर्ब’ अशी दिलखुलास आरोळी आम्ही ऐकली तेव्हा एकमेकांकडे फक्त पाहिलं आणि हसलो. त्याला लोकांचा गराडा पडला. मी बाजूला झालो. अनेक आया त्याच्याशी बोलता बोलता रडायला लागल्या आणि पुढे अर्धा तास मी हे सुखावून टिपत राहिलो. सगळ्या परीक्षणांमध्ये त्याचं भरभरून कौतुक आलंय. दोनच दिवसांत मराठीतले उत्तमोत्तम दिग्दर्शक त्याचं काम बघून खुश झालेत आणि त्याला ‘डिस्कव्हरी’ म्हणतायत आणि प्रेक्षक तर त्याला आपला घरचाच मुलगा मानतात, त्यामुळे त्याच्या यशाने तेही आनंदून गेलेत याची जाणीव पुन्हा एकदा लख्खपणे झाली.”
पुढे क्षितिज म्हणतो, “टिपिकल पुणेरी मराठी मुलाचा मोल्ड आम्हाला मोडायचा होता, तरुण पिढीला आपला वाटेल असा नवा इंजिनीयर उभा करायचा होता आणि मराठीत दीर्घ पल्ल्यात काम करू शकेल असा नायक दाखवायचा होता. त्याची ही सुरुवात आहे. हाऊसफुल शोजना जाऊन आल्यानंतर मी म्हटलं, “तुझ्यावर लोकं एवढं प्रेम करतात, याचाही बाकीच्यांना त्रास होत असेल की! आणि तुझ्या बाबांच्या बाबतीतसुद्धा असंच होतं!” त्यावर तो म्हणाला “आपल्या क्षेत्रात एक तर उगवतीचा किंवा मावळतीचा सूर्य बघायला आवडतो सर, दुपारी १२ चा कोणाला नको असतो!” तो सत्तावीसचा आहे; पण सत्तरीच्या अनुभवासारखं बोलला.”
त्यानंतर क्षितिजनं म्हटलं, “अभिनयला जे मिळतंय; ते फार कमी लोकांना मिळतं. कारण- कदाचित त्यानं जे पाहिलंय, ते फार कमी लोकांनी पाहिलंय. तेवढी शक्ती, संयम आणि तयारी त्याच्यात आहे, म्हणूनच तू जे काम केलंयस; त्याइतकंच तू जसं हे सगळं हाताळलं आहेस, त्याचा लक्ष्मीकांत सरांना प्रचंड अभिमान वाटत असणार आहे.”
