Kedar Shinde shares post about Swami Samarth: केदार शिंदे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे मोठ्या प्रमाणात गाजले आहेत. २०२३ साली प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा त्यापैकीच एक आहे.
कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड असल्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वावेळी केदार शिंदे मोठ्या चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
“श्वासाचा शेवट तुमच्या नामानेच व्हावा…”
या चित्रपटात ‘बिग बॉस ५’चा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय असलेला सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सूरजला ट्रोल केले होते, त्यावेळीदेखील केदार शिंदेंनी ट्रोलिंगवर वक्तव्य केले होते. आता केदार शिंदे हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.
केदार शिंदे यांनी श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “श्री स्वामी समर्थ महाराज की जय. १९९७ रोजी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, तोपर्यंत मला तुमच्याविषयी माहीत नव्हतं; कारण आमच्या घराण्यात कुणीही तुमची सेवा, भक्ती केली नव्हती. ती संधी तुम्ही मला दिलीत. मार्ग दाखवला. माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
त्यांनी पुढे लिहिले, “तुम्ही नसतात तर कदाचित मी नसतोच, कारण खूप स्थित्यंतर या वर्षांत घडली. आज २८ वर्षे पूर्ण होत आहेत. श्वासाचा शेवट तुमच्या नामानेच व्हावा हीच तुमच्या पायी प्रार्थना.”
“आज व्यावसायिक रंगभूमीवर माझं गाजलेल नाटक ‘आमच्यासारखे आम्हीच’लादेखील २८ वर्षे पूर्ण झाली. कदाचित त्याच दिवशी माझ्या आयुष्यात येऊन तुम्ही मला जाणीव करून दिलीत की आमच्यासारखे आम्हीच”, असे म्हणत केदार शिंदेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांच्यामागे स्वामी समर्थांचा फोटो दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी ‘श्री स्वामी समर्थ’ अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘येड्यांची जत्रा’, या सिनेमांसाठीदेखील केदार शिंदे ओळखले जातात. आता आगामी काळात त्यांचा कोणता चित्रपट भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.