दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चांचे मुख्य कारण त्यांचा आगामी मराठी चित्रपट ठरला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. त्याच्या फर्स्ट लूकची झलकही सर्वांसमोर आली आहे. त्यानंतर मात्र याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयची केलेली निवड अनेकांना अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे नेटकरी सध्या महेश मांजरेकर आणि अक्षयला ट्रोल केलं जात आहे. पण नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भूमिकेसाठी अक्षयची निवड का केली याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “हा लूक अजून फायनल झालेला नाही…” छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमारचे जाहीर वक्तव्य

या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड का केली? असा प्रश्न महेश मांजरेकरांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी कोणालाही घेतलं असतं तरी हाच प्रश्न मला विचारण्यात आला असता. पण तरीही मी याचे उत्तर देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. पण मला या देशाच्या कानाकोपऱ्यात जगभरात त्यांना पोहोचवायचे होते. त्यामुळे मला त्या ताकदीची भूमिका साकारणारा कलाकार हवा होता.”

“आता हा कलाकार कोण असावा याचा विचार मी करत होतो. त्यावर मी एक स्वच्छ प्रतिमा असलेला, स्वत:ची प्रत्येक गोष्टीत काळजी घेणारा अभिनेता हवा होता. त्यावेळी अक्षय कुमार हे नाव पुढे आलं. एक तर त्याचं नाक फार धारदार आहे, हे एक कारण आहे. मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांनी गोष्ट ऐकली आणि मी करणार असे अक्षय मला म्हणाला. त्यानंतर या सर्व गोष्टी जुळून आल्या”, असेही मांजरेकरांनी सांगितले.

आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण

दरम्यान ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. संकलन मनीष मोरे तर छायांकन अभिमन्यू डांगे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे असणार आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत हितेश मोडक यांचे आहे. साहस दृश्ये प्रद्युमन कुमार स्वान यांची आहेत. उमेश शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचा थरार रुपेरी पडद्यावर २०२३ च्या दिवाळीदरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director mahesh manjrekar talk about why he cast akshay kumar chhatrapati shivaji maharaj role in vedaat marathe veer daudale saat nrp
First published on: 03-11-2022 at 19:14 IST