मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते महेश टिळेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. त्यांच्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सामाजिक विषयांवर तसेच कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर महेश टिळेकर परखडपणे आपलं मत मांडत असतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीमधील अनुभव सांगितला आहे.
“एका मराठी अभिनेत्रीने तुम्हाला ओळख दाखवली नव्हती…अशी पोस्ट आम्ही वाचली, ते नेमकं काय झालं होतं? असा प्रश्न महेश टिळेकरांना ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीत विचारण्यात आला.
यावर महेश टिळेकर सांगतात, “त्या अभिनेत्रीने आमच्याबरोबर काम देखील केलं होतं. मी ‘मराठी तारका’ पुस्तक लॉन्च केलं होतं…तेव्हा सुद्धा त्या आल्या होत्या. त्यानंतर मी अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक कार्यक्रम केला होता…. आता तुमच्यासमोर नावच घेतो…अश्विनी भावे.”
अभिनेते पुढे म्हणाले, “माझी अशी इच्छा होती की, अशोक सराफांबरोबर त्यांनी काम केलं आहे, तर त्या कार्यक्रमाला त्यांनी यावं. वर्षा उसगांवकर सुद्धा आल्या होत्या. अश्विनी भावे यांना मी मेसेज केला…त्यावर उत्तर नाही, फोन केल्यावर त्यावर रिस्पॉन्स नाही. दोन दिवसांनी त्यांच्या मॅनेजरने फोन केला…तिने म्हटलं, ‘मॅमनी विचारलंय काय काम आहे?’ मी तिला म्हणालो, ‘मी मॅमशी बोलेन…तुझ्याशी का बोलू?’ कारण, आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यात आम्ही एका इंडस्ट्रीत आहोत. अशा परिस्थितीत जर तुम्ही मॅनेजर दाखवणार असाल तर मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो. तुम्ही मोठे तुमच्या घरी…त्यांच्यापेक्षा दिग्गज लोकांबरोबर माझं काम करून झालंय. हे त्यांना सुद्धा समजायला हवं होतं. कारण, मेसेज करताना मी खाली महेश टिळेकर हे नाव सुद्धा लिहिलं होतं.”
“उमराव जान’च्या वेळी सुद्धा त्या मला भेटल्या होत्या…पण, त्यांनी ओळखच दाखवली नाही. तिथे विद्या बालन सुद्धा होती…तिला मी एकदाच भेटलो होतो. पण, एकदा भेटूनही तिने मला ओळख दाखवली होती. मराठीत तुम्ही कसलं मॅनेजर वगैरे सांगताय. आता वर्षा उसगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे या लोकांनी सुद्धा मराठीसह हिंदीत काम केलंच आहे ना? पण, लक्ष्याने मला कधीच सांगितलं नाही की, माझ्या मॅनेजरशी बोल.” असा अनुभव महेश टिळेकरांनी यावेळी सांगितला.
