दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेतील जातीभेद, विषमता याबाबत अत्यंत प्रभावीपणे आणि वास्तववादी सामाजिक भाष्य केलं आहे. ‘सैराट’ असो किंवा ‘फँड्री’ नागराज मंजुळेंनी त्यांच्या प्रत्येक सिनेमात जातीव्यवस्था आणि मानवी नातेसंबंधांचं अत्यंत प्रभावी चित्रण केलं आहे. नुकत्याच एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक सेगमेंटमध्ये त्यांनी याबाबत स्पष्ट मतं मांडली. आजही माणसाने आडनाव लपवलं तरी लोक… गाव, पाहुणे विचारून त्याची जात शोधून काढतातच, असं सांगत त्यांनी वास्तवावर बोट ठेवलं आहे.

सिनेमांमध्ये आडनावं ठेवताना विचार करावा लागतो का? याविषयी नागराज मंजुळे म्हणाले, “आपल्याकडे खूप शिताफीने जे महत्त्वाचं आहे तेच लपवलं जातं. मी बालपणापासून इतकी वर्षे जे सिनेमे पाहतोय त्यात बहुतांशवेळा दाखवलं जातं की, हिरो-हिरोईन प्रेमात पडतात आणि नंतर घरचे परवानगी देत नाहीत. का तर? त्या दोघांपैकी एकजण गरीब असतो आणि दुसरा श्रीमंत. यापेक्षा वेगळं काहीच नसतं. पण, यामागे श्रीमंत-गरीब हे एवढंच कारण नाहीये. मग मला लक्षात आलं की, यामध्ये जात असते…जातीची आडनावं असतात.”

नागराज मंजुळे पुढे म्हणाले, “मला ते ‘नमक हलाल’ चित्रपटातील गाणं आठवतंय. “के पग घुंघरू बांधे” या गाण्यात एक वाक्य आहे, “क्या देश है… क्या जात है.. क्या उम्र है… क्या नाम है..अरे छोड़िये इन बातों से…हमको भला क्या काम है” मला हे गाणं ऐकून असं झालं अरे प्रश्न विचारा…हिंदी सिनेमांमध्ये असंच आहे, तिथपर्यंत आले पण महत्त्वाचा प्रश्नच विचारला नाही. “अरे छोड़िये इन बातों से…हमको भला क्या काम है” असं बोलून तो विषय बंद केला. आपण कुरुप, दुखऱ्या वास्तवाला मुलामा लावून श्रीमंत-गरीब किंवा काहीतरी वेगळंच दाखवतो. म्हणूनच मला असं वाटलं की आडनाव, नावं, व्यवसाय ( कोणत्या जातीशी कोणता व्यवसाय निगडीत आहे ) या गोष्टी सिनेमातून दाखवल्या पाहिजेत. आता बऱ्यापैकी समाजात सुधारणा होतेय.”

“आता बरेच लोक आडनाव न दाखवता फक्त स्वतचं नाव किंवा स्वत:चं अन् वडिलांचं नाव लावतात. पण, अलीकडची माणसं समोरच्याचं आडनाव शोधूनच काढतात. आता मी माझं नाव नागराज पोपटराव सांगितलं आणि आडनाव मुद्दाम लपवलं तर मग माणसं स्वत:हून विचारतात तुम्ही कुठले? यावर दलित साहित्यात बऱ्याच छान कविता सुद्धा आहेत. माणूस जात शोधून काढतोच. म्हणजे एखाद्याने आडनाव सांगितलं तरी, त्यांचे पाहुणे वगैरे सगळं विचारून घ्यायचं. शेवटी मग समोरच्याला समजतं की कोण कुठलंय.” असं मत नागराज मंजुळेंनी व्यक्त केलं.