Ravi Jadhav Gives Update About Bal Shivaji : साधारण दोन वर्षांपूर्वी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘बाल शिवाजी’ नावाच्या सिनेमाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेक शिवप्रेमी आणि सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहे. मात्र पोस्टर समोर आल्यानंतर सिनेमाची काहीच अपडेट आली नाही, ज्याबद्दल रवी जाधव यांनी नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
रवी जाधव यांच्या ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या पोस्टरवर ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर पाहायला मिळाला होता. त्यामुळे त्याचे अनेक चाहतेसुद्धा या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा कधी येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याच सिनेमाची सध्याची अपडेट काय आहे, याबद्दल रवी जाधव यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
कॅचअप या युट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात त्यांना ‘बाल शिवाजी’ सिनेमाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, “‘राजा शिवाजी’सारखं बजेट मराठीत खूप कमी स्टुडिओ देऊ शकतात. त्यामुळे माझ्याकडे इतकं मोठं बजेट असणार नाही. मग छोट्या बजेटमध्ये मी काय करू शकतो? मला आई आणि मुलाची गोष्ट सांगायची होती, ज्यात युद्ध जास्त नसतील तर माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते. ते घडले कसे? म्हणून मी ‘बाल शिवाजी’ची घोषणा केली. ती गोष्ट लिहून झाली आहे. मग निर्माते मिळाल्यानंतरच मी पोस्टर टाकलं.”
“छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमासाठी…”
पुढे ते म्हणाले, “नंतर मला असं वाटलं की, निर्माता असा पाहिजे ज्याची त्या गोष्टीवर भक्ती असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाचा फक्त व्यवसाय होऊ शकत नाही. व्यवसाय असेल, कारण त्यात ज्याची इनव्हेस्टमेंट असेल त्याला त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. पण त्याचबरोबर भक्तीसुद्धा हवी. दोनच्या ऐवजी चार पैसे खर्च करा. पण ते असंच करू, असा निर्माता मी शोधत आहे.”
‘छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करायचं स्वप्न…”
यानंतर रवी जाधव सांगतात, “सध्या अनरिअल इंजिन असं नवीन तंत्रज्ञान आलं आहे. त्यावर मी हा पूर्ण सिनेमा एकाच स्टुडिओ करू शकतो. तर त्याचाही शोध सुरू आहे, मला ‘बाल शिवाजी’ सिनेमा अशा पद्धतीनं करायचं आहे, ज्यातून मलासुद्धा नवीन काहीतरी शिकायला मिळेल. दिवसेंदिवस मला त्याबद्दलल नवीन काहीतरी सुचत आहे. जस-जसे इतिसाताले नवीन संदर्भ येत आहेत, तसतसं मला आणखी मजा येतेय. माझं २०१५ पासून छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करायचं स्वप्न आहे आणि मी ते नक्की पूर्ण करणार.”
दरम्यान, ‘बाल शिवाजी’ या बहुप्रतीक्षित सिनेमाआधी या वर्षात त्यांचा ‘फुलवरा’ नावाचा सिनेमासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचीसुद्धा सध्या सर्वत्र चर्चा आहे. रवी जाधव यांचे अनेक चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत.
