गेल्या काही महिन्यात मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. यातील अनेक ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर गेल्या आठवड्यात 'रावरंभा' हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने चांगली कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. २६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. नेसरीच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या स्वराज्याच्या सात वीरांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता शंतनू मोघे याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता ओम भुतकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट पाहायला अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी गर्दी केली आणि या चित्रपटाचे शो हाऊसफुल झाले. आणखी वाचा : कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत, ‘या’ आगामी ऐतिहासिक चित्रपटातील लूक प्रदर्शित, म्हणाला… हा चित्रपट तयार करण्यासाठी ६ हून अधिक कोटींचा खर्च आला आहे. तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५० लाखांची कमाई करत चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ६५ लाख, तिसऱ्या दिवशी ८० लाख, तर चौथ्या दिवशी ४० लाखांची कमाई या चित्रपटाने केली. पाचव्या आणि सहाव्या दिवशी या चित्रपटाने अनुक्रमे ३५ लाख आणि ३० लाख अशी कमाई केली. तर सातव्या दिवशीही या चित्रपटाने ३५ लाखांचा गल्ला जमवला. एकूण मिळून या चित्रपटाने एका आठवड्यात ३ कोटी १४ लाखांची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३.५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. हेही वाचा : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’नंतर शंतनू मोघे पुन्हा एकदा दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित या चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात किती कमाई केली हे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांशी शेअर केलं. तर आताही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.