Siddharth Jadhav won Best Supporting Actor Award: प्रिया बापटसह ‘या’ कलाकारांनी केला अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव; अभिनेत्याचे फोटो पाहिलेत का? नुकताच ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात उत्कृष्ट मराठी सिनेमे, कलाकारांचा गौरव करण्यात आला. तसेच, दिग्दर्शकांचाही गौरव करण्यात आला.

शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये भरत जाधव, ओम भूतकर, सिद्धार्थ जाधव, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमाचे वेळोवेळी कौतुक झाले आहे.

११ व्या मराठी फिल्मफेअर सोहळ्यात पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवने साजरा केला आनंद

आता ११ व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट डायलॉग, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट गायक व गायिका असे पुरस्कार मिळाले आहेत.

आता सहाय्यक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने पोस्ट शेअर केली आहे. त्याने काही फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले, “मी खूप आनंदी आहे.” तसेच, ‘आता थांबायचं नाय’ टीमचे आभार मानले.

सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोत त्याने बेडवर ट्रॉफी ठेवली आहे आणि तो त्याच्याकडे बघत असल्याचे दिसत आहे; तर दुसऱ्या फोटोत ट्रॉफी शेजारी ठेऊन तो हसत असल्याचे दिसत आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. प्रिया बापटने कमेंट करत लिहिले, “वाह!अभिनंदन आणि खूप प्रेम”, स्नेहा रायकर यांनी लिहिले, “अभिनंदन”, शिवाली परबने, “अभिनंदन दादा” अशी कमेंट केली आहे. याबरोबरच गौरव मोरे, प्रथमेश परब, पल्लवी वैद्य, सचित पाटील, कुशल बद्रिके, भाग्यश्री मोटे अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत सिद्धार्थवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ कायमच त्याच्या विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आता आगामी काळात तो कोणत्या सिनेमात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.