Gondhal India’s official entry for 99th Academy Awards : जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘गोंधळ’ (Gondhal) या मराठी चित्रपटाची अधिकृत एंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत घोषणा केली. देशभरातील ३० हून अधिक चित्रपटांमधून दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या या पहिल्याच चित्रपटाने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककलेवर आणि धार्मिक विधीवर आधारित हा चित्रपट आहे.

एफएफआयचे अध्यक्ष अभय सिन्हा, सचिव धर्मेंद्र मेहरा, खजिनदार संग्राम शिरके, संरक्षक टी. पी. अग्रवाल, उपाध्यक्ष हिराचंद, निशांत उज्ज्वल आणि अध्यक्ष पी. शेषाद्री यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली. ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’, हनुमान अंश यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ची निवड झाली आणि भारताचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला.

Marathi film Gondhal selected as India official entry for 99th Academy Awards
९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री ठरलेला मराठी चित्रपट ‘गोंधळ’.

गोंधळ चित्रपटाची कथा

महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककलेच्या व धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या परंपरा, लोककला आणि श्रद्धांचा अनोखा संगम दाखवतो. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा केवळ धार्मिक विधीवर मर्यादित न राहाता मानवी भावना, अंधश्रद्धा, आणि समाजातील बदलणारे दृष्टिकोन यांचाही वेध घेतो. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टतेसह ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर मांडतो. आता ‘गोंधळ’चा प्रवास स्थानिक पातळीवरून थेट आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचला आहे.

गोंधळ चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे कलाकार आहेत.

गोंधळ हा दिग्दर्शक संतोष डावखर यांचा पहिलाच चित्रपट असून गोव्यात झालेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ मध्ये या चित्रपटाचा पहिला प्रिमियर झाला होता. तिथे या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्काराचा ‘सिल्व्हर पीकॉक’ मिळाला होता. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. हा चित्रपट नोव्हेंबर २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.