समीर जावळे

परेश मोकाशी यांची चित्रपट दिग्दर्शित करण्याची आणि तो हाताळण्याची एक वेगळी हातोटी आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’पासून ‘वाळवी’पर्यंत हे आपण लक्षात घेतलं आहेच. आता त्यांचा नवा चित्रपट आला आहे ज्याचं नाव आहे ‘नाच गं घुमा’ मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, सारंग साठे यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे.

चित्रपटाची थोडक्यात कथा काय?

चित्रपटाची कथा उच्च मध्यमवर्गीय त्रिकोणी घरात घडते. घरात कामासाठी बाई आली नाही किंवा वेळेवर आली नाही किंवा तिने सुट्टीच घेतली तर काय? या आजकालच्या नोकरी करणाऱ्या गृहिणीपुढे पडलेल्या प्रश्नांवर हा चित्रपट आधारलेला आहे. राणी (मुक्ता बर्वे) आणि आनंद (सारंग साठे) यांना शाळेत जाणारी एक मुलगी चिकू (मायरा वायकूळ) आहे. या दोघांनाही नोकरीसाठी जावं लागत असल्याने चिकूला सांभाळण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बारा तास काम करणारी बाई त्यांना हवी आहे. आशाताई (नम्रता संभेराव) या त्यांच्याकडे येतात. पण त्या वेळ पाळत नसतात. म्हणून राणी त्यांना कामावरुन काढून टाकते. पण मग राणी आणि आनंदची पंचाईत होऊ लागते, पण आशाताईंना परत काम दिलं जातं. आधी वेळ न पाळणाऱ्या आशाताई वेळेवर येऊ लागतात. नंतर एके दिवशी एक घटना घडते ज्यानंतर राणी अक्षरशः हाताला धरुन हाकलून देते. या सगळ्यानंतर काय काय घडतं?, आशाताई असं काय वागतात? राणीचं काय होतं? आनंदची भूमिका काय? या दोघांच्याही आया घरात राहण्यासाठी येतात तेव्हा काय होतं ? या सगळ्यावर सिनेमा भाष्य करतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

परेश मोकाशींच्या नेहमीच्या टचपेक्षा थोडासा वेगळा सिनेमा

परेश मोकाशींनी थोडासा आपला टच बाजूला ठेवून या सिनेमात काम केल्याचं जाणवतं. मध्यंतराचा भाग हा अत्यंत वेगवान आहे. ठाण्यात ही कथा घडते त्यामुळे तिथला वेग हा चित्रपटाच्या भागालाही आल्याचं दिसतं. बाई वेळेवर न आल्याने उडणारी तारांबळ, लेटमार्क, नवरा बायकोमध्ये होणारे वाद या सगळ्यावर विनोदी अंगाने चपखल भाष्य करण्यात परेश मोकाशी यशस्वी झाले आहेत. सिनेमातले संवाद ही सिनेमाची आणखी एक जमेची बाजू आहे. तसंच कॅमेरा वर्कही उत्तम झालं आहे. आशाताईंना ओरडत असताना चिकूचं शांतपणे आईकडे बघत राहणं. मुलाला तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहेस हे सांगताना सारंगचा झालेला चेहरा. आशाताईंना घराबाहेर काढलं जातं तेव्हा दरवाजाच्या बाहेर आशाताई आणि दरवाजाच्या आत राणी यांचे क्लोज हे सगळं उत्तम झालंय.

nach ga ghuma teaser launch mukta barve and namrata sambherao
‘नाच गं घुमा’चा टीझर

मुक्ता बर्वेने साकारलेली राणी क्लास

या सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे ती म्हणजे मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा अभिनय. मुक्ता बर्वेने बँकेत काम करुन घर सांभाळणारी ‘राणी’ साकारली आहे. जी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आशाताईंवर चिडते. पण तिला आशाताईंची जाणीव आहे. आशाताईंना ती काम करणारी बाई किंवा मोलकरीण म्हणून वागवत नाही. ती त्यांना घरातल्याच एक सदस्य आहेत अशा पद्धतीने वागवते. राणी कधी कधी आक्रस्ताळेपणानेही वागते असं वाटतं पण यामागे तिचा वरवरचा राग नाही. तिला एक स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यासाठी ती प्रयत्न करते आहे. सिनेमाच्या मध्यंतरानंतर एक प्रसंग घडतो तेव्हा राणी घरी येऊन सगळे ग्लास खाली फेकून देते आणि रडत जे सांगते तेव्हा तिचा स्वभाव उलगडतो. वरवर चिडचिडी वाटणारी राणी उराशी एक स्वप्न बाळगून आहे. तिला ते आता पूर्ण करायचं आहे पण ते पूर्ण होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण होते. त्यातून काय काय गोष्टी घडतात? हा सगळा प्रवासही रंजक झालाय.

चित्रपटात भाव खाऊन गेली आहे ती नम्रता संभेरावच

सिनेमात भाव खाऊन गेली आहे ती म्हणजे नम्रता संभेराव. आशाताई या भूमिकेत ती इतकी चपखल बसली आहे की तिच्याऐवजी दुसऱ्या कुणाचा विचारही आपण करु शकत नाही. वाळवीमध्ये नम्रताच्या अभिनयाची खास झलक दिसली होती पण ती भूमिका छोटी होती. नाच गं घुमाच्या निमित्ताने तिने साकारलेल्या आशाताई हा तिच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरेल इतकी त्या या भूमिकेशी एकरुप झाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये ती अनेक पात्रं साकारते, त्यातली तिची डॉली अवखळ आहे. मात्र या सिनेमातल्या आशाताई तिने ज्या ताकदीने साकारल्या आहेत त्याला जवाब नाही. जेव्हा हाताला धरुन बाहेर काढलं जातं त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? हे सांगताना तिचा झालेला चेहरा, कामावरुन काढून टाकलेलं असतानाही चिकूला शाळेत आणायला जाणं आणि राणी दिसल्यानंतर काहीही न बोलता तिथून बाहेर पडणं, राणी आणि तिच्यातले संवाद, वाद, घरकाम करणाऱ्या, बसच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या आशाताई हे सगळं तिने लीलया साकारलं आहे. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे तिचं हसतमुख राहणं आणि तितकंच नम्र राहणं. आशाताईंच्या भूमिकेत दुसऱ्या कुणाचा विचारही आपण करु शकत नाही इतकी नम्रता संभेराव या भूमिकेशी समरस झाली आहे.मुक्ता बर्वेचे फॅन म्हणून जर चित्रपट बघायला गेलो तर नम्रताच्या प्रेमात पडून सिनेमा हॉलच्या बाहेर आपण पडतो.

सिनेमाचा शेवट काय होतो? हे सांगण्यात काही अर्थ नाही तो अनुभव थिएटरमध्ये जाऊनच घ्यायला हवा. कामाची घाई कुठल्या घरांत नसते? प्रत्येकच घरातली गोष्ट यात सांगण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न परेश मोकाशींनी चांगला जमवला आहे. विशेष म्हणजे तो विनोदी अंगाने जमवणं हे तर फार कठीण काम, पण ते त्याने लिलया साधलं आहे. सिनेमात आठ दिवसांसाठी जेव्हा आशाताईंना काढून टाकलं जातं तेव्हा मुक्ताने गायलेलं एक गाणं आहे ते नसतं तरी चाललं असतं असं वाटतं. बाकी सगळा सिनेमा लेखन, संगीत, अभिनय, दिग्दर्शन या बाबतीत सरस झाला आहे. मोलकरणीचं आणि माणुसकीचं मोल याचा उत्तम संदेश देणारा हा सिनेमा आहे. ‘कामवाली बाई’ या शब्दाची नवी व्याख्याही राणी सांगून जाते ती पटतेही. त्यामुळे एक चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान आपल्याला प्रेक्षक म्हणून मिळतं यात शंकाच नाही.

Story img Loader