छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभे करताना निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची मोलाची साथ लाभली. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. यावर आधारित असलेला रावरंभा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद देताना दिसत आहेत. नुकतंच एका दिग्दर्शकाने याबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी रावरंभा चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबर त्यांनी हा चित्रपट कसा आहे, याबद्दल लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

महेश टिळेकर यांची पोस्ट

डोळ्यात आणि ह्रुदयात साठवावा ‘राव रंभा’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत प्रेक्षकांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले.पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच ‘राव रंभा’ सिनेमा आहे.

हा सिनेमा आपल्याला सर्वच बाबतीत तृप्त करून एक सुखद अनुभुती देतो. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले ,फिल्मी वाटावे असे संवाद ह्या सिनेमात नाहीत आणि म्हणूनच सिनेमा भावतो.प्रताप गंगावणे यांची पटकथा आणि संवाद कुठेही आपल्याला ” कधी संपतोय सिनेमा?” हा प्रश्न मनात येऊ देत नाहीत. सिनेमात विविध पात्रे साकारणारे कलाकार विनाकारण बेबिंच्या देठा पासून दात ओठ खात राक्षसा सारखे किंचाळताना दिसत नाहीत आणि याचमुळे कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो.सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर याने साकारलेला खलनायक इतका चीड आणनारा की जुन्या जमान्यातील खलनायक राजशेखर यांची आठवण आली आणि खंत जाणवली की संतोष इतका गुणी कलाकार मराठीत असताना मराठीत त्याचं म्हणावं तितकं कौतुक झालं नाही.

सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल ह्या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहील असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची जरब एकदम लाजवाब.युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणनारा.शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे जान आणतो.नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का?

या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे हे प्रत्येक फ्रेम मध्ये जाणवते. चित्रपटातील साहस दृश्ये काळजाचा ठोका चुकविणारी आणि याआधी मराठीतल्या कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात क्वचितच पहायला मिळालेली अशी आहेत.निर्मितीत कुठेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे… मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास ‘राव रंभा ‘ अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील, असे महेश टिळेकर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात…” मानसी नाईकने व्यक्त केली मनातील घुसमट, घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोलली

दरम्यान ‘रावरंभा’ हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ असलेला चित्रपट गेल्या १२ मे रोजी प्रदर्शित झाला. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारांच्या ही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi producer director mahesh tilekar share post about chhatrapati shivaji maharaj raavrambha movie nrp
Show comments