Saleel Kulkarni Reaction On Virat Kohli Test Retirement : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्त होत असल्याचं स्पष्ट केलं. आपली कसोटी कारकीर्द अधोरेखित करताना त्याने एक भावनिक पोस्ट शेअर करत टेस्ट क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे.
विराटच्या निवृत्तीवर आता क्रिकेट जगतासह मनोरंजन विश्वातून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याची पत्नी अनुष्का शर्मा, बॉलीवूड अभिनेता विकी कौशल या सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील योगदानासाठी त्याचे आभार मानले आहेत. याशिवाय मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी देखील विराटच्या निवृत्तीनंतर खास पोस्ट शेअर करत कोहली टेस्ट क्रिकेटमधून खूपच लवकर रिटायर झाल्याचं अधोरेखित केलं आहे.
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय गायक व संगीतकार सलील कुलकर्णी क्रिकेट विश्वातील घडामोडींवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. मात्र, विराटच्या निवृत्तीवर गायकांनी काही प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. विराट रिटायर का झाला? असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.
सलील कुलकर्णींची पोस्ट
१०,००० रन्सच्या इतक्या जवळ असताना, फिटनेस आणि खेळण्याची भूक २००% असताना… विराट रिटायर का झाला?
त्याला त्याचा सर्वात आवडता फॉरमॅट एवढ्या लवकर का सोडावा लागला?
यामागे काहीतरी गूढ!!!
आज मला या चॅम्पियन खेळाडूबद्दल खूप वाईट वाटत आहे…
त्याला मैदानावर अतिशय सन्मानपूर्वक निरोप सोहळा मिळायला हवा होता…आणि तेही आणखी ३ वर्षांनी! Why Virat KohliThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, सलील कुलकर्णींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत विराट टेस्टमधून निवृत्त झाला याचं दु:ख आहेच पण, स्वत:च्या इच्छेनुसार तो वेळेत रिटायर झाला हे खूपच चांगलंय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराट कोहलीने आजवर खेळलेल्या १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९ हजार २३० धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतकं तर, ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.