scorecardresearch

Video : सयाजी शिंदेंची हटके भूमिका, नागराज मंजुळे यांचा डॅशिंग अवतार; बहुचर्चित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटामुळे ‘घर बंदूक बिरयानी’चं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं

ghar banduk biryani trailer

‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे नागराज मंजुळे गेले काही दिवस त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘घर बंदूक बिरयानी.’ सर्व प्रेक्षक त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मध्यंतरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या तो चांगलाच पसंतीस पडला. आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

‘झी स्टुडिओ’च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून चित्रपटातील कथानकाबद्दल फारसं काहीच सांगितलं नसल्याने याविषयी प्रेक्षकांच्या मनातील कुतूहल कायम राहील अशी आशा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक डायलॉग आहे तो म्हणजे, “स्वर्ग उगाच काश्मीरला म्हणतात, खरंतर स्वर्ग आपल्या कोलागडला म्हंटलं पाहिजे.” या डायलॉगवरुन याची कथा या गावाभोवती फिरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : “पठाणमुळे बॉयकॉट ट्रेंड…” ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमींचं चित्रपटसृष्टीतील बदलाविषयी मोठं वक्तव्य

चित्रपटात सयाजी शिंदे हे एका वेगळ्याच आणि हटके भूमिकेत दिसणार आहेत, त्यांची भूमिका उग्रवादी संघटनेचे मुख्य नेता अशा धाटणीची ट्रेलरवरुन वाटत आहे. याबरोबरच नागराज मंजुळेसुद्धा डॅशिंग अशा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. या ट्रेलरमधील नागराज हे जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे शिवाय त्यांचा लूकही लोकांना आवडला आहे. शिवाय आकाश ठोसर आणि सायली पाटील यांचीसुद्धा एक हटके भूमिका यात पाहायला मिळणर आहे.

चित्रपटाविषयी जास्त माहिती ट्रेलरमधून दिली नसली तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात निर्मात्यांना यश मिळालं आहे. शिवाय चित्रपटाचं पार्श्वसंगीतही याची एक जमेची बाजू आहे. अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटामुळे ‘घर बंदूक बिरयानी’चं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं.

आता हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रेक्षक या हटके चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 12:13 IST