Mardini Marathi Movie : २०२६ मध्ये अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला यश मिळत असतानाच आता आणखी एका सिनेमाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे. अशाच प्रभावी कथानकासह आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘मर्दिनी’.

‘मर्दिनी’ या आगामी मराठी चित्रपटाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. पोस्टरमधून समोर आलेली पहिली झलक आणि त्यावरील आशयपूर्ण कॅप्शनमुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या सामर्थ्याची कथा मांडणारा हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

श्रेयस तळपदे प्रस्तुत ‘मर्दिनी’ हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, आईच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी ही कथा आहे. पोस्टरवरील “आई तारी तिला कोण मारी” म्हणजेच लेकरांसाठी आई ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही… हे कॅप्शन चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक देतं. आई ही फक्त प्रेम, माया आणि जपणुकीची प्रतिमा नसते, तर आपल्या लेकरांवर संकट आलं की ती कठोर आणि निर्भय रूप धारण करून त्यांचं रक्षण करण्यासाठी उभी राहते, ही भावना या कथानकातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे.

चित्रपटात एका आईचा संघर्ष, तिची कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य स्त्री कशी परिस्थितीशी दोन हात करते आणि वेळ आली तर ‘मर्दिनी’सारखं सामर्थ्यवान रूप धारण करते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे.

चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावीपणा मिळणार असून, बालकलाकार मायरा वायकुळ हिची भूमिका कथेत भावनिक पैलू जोडणारी ठरणार आहे.

अजय मयेकर यांचा ‘मर्दिनी’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली हा चित्रपट साकारला जात आहे. याची सहनिर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ तर संगीत हितेश मोडकने दिलं आहे.

दरम्यान, आईचं प्रेम, संरक्षण आणि संघर्षाच्या भावनिक कथेला मध्यवर्ती ठेवणारा हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, यामध्ये प्रार्थना बेहेरे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.