मिलिंद गवळींनी गिरीजा ओकबरोबरच्या चित्रपटातील काही खास फोटो शेअर करत तिला नॅशनल क्रशही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महिलाकेंद्रीत विषयांवर किती चित्रपट बनतात याबद्दल भाष्य केलं आहे. मिलिंद गवळींनी त्यांचा हा जुना चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा महिला प्रेक्षकांनी तो पाहण्यासाठी मोठ्या संख्यने गर्दी केली होती असं सांगितलं आहे.
मिलिंद गवळींची पोस्ट
मिलिंद यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याला मोठी कॅप्शन दिली आहे. ते म्हणाले, “माझी कन्या भाग्यश्री, मुलगी झाली प्रगती झाली, बेटी बचाव बेटी पढाव, मुलगा-मुलगी एक समान, दोघांनाही द्या सन्मान. बुद्धिमत्तेत मुलगा-मुलगी असा फरक नसतो. दोघांमध्ये तेवढीच क्षमता असते, फक्त संधी मिळणे महत्त्वाचं ठरतं. संधी मिळाल्यावर मुलींनी अवकाश, विज्ञान, प्रशासन, क्रीडा या सर्व क्षेत्रांत झेंडा रोवला आहे. १०वी, १२वीच्या निकालात मुलींची टक्केवारी दरवर्षी जास्त असते. आयएएस, आयपीएस परीक्षांत मुली अव्वल येत आहेत.”
गिरिजा ओकबद्दल काय म्हणाले मिलिंद गवळी
“आज द्रौपदी मुर्मू आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. अशा विषयावर एक छानसा मराठी सिनेमा आम्ही केला होता, त्या सिनेमाचं नाव पण अतिशय गोड आहे चिंगी, सध्याची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी गिरिजा ओक गोडबोले या गर्भात असलेल्या चिंगीच्या आईच्या मुख भूमिकेत आहे, आणि मी चिंगीच्या वडीलांच्या भूमिकेत, अतिशय गोड विषय अशोक पाटोळे यांनी लिहिला होता, अशोक पत्की यांचं संगीत आणि राज ईसरानी यांनी दिग्दर्शन तर, त्यांच्या पत्नी अनिता इसराणी यांनी निर्मिती केली होती.”
मिलिंद गेवळी पुढे म्हणाले, “हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळेला महिलांनी तुडुंब गर्दी केली होती, आणि त्यांना चित्रपट अतिशय भावला होता. स्त्री सशक्तिकरण विषयावरचा अतिशय गोड हलकाफुलका कौटुंबिक चित्रपट आहे. मोजक्या चित्रपटगृहात दोन आठवडे चित्रपट चालला. खूपच मोजक्या लोकांनी चित्रपट पाहिला असणार, हा चित्रपट कुठल्याही वाहिनीवर आला नाही, हा चित्रपट कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही, युट्युब वर ही नाही आहे. म्हणजे हा फारच कमी लोकांनी पाहिलेला सुंदर चित्रपट आहे.”


मिलिंद गवळी चित्रपटाबद्दल पुढे म्हणाले, “त्यामुळे हा लोकांपर्यंत पोहोचावा असं मला मनापासून वाटत आलं आहे. ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झीफाईव, सोनीलिव किंवा युट्युब यापैकी कुठल्याही एका प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचं असणं गरजेचं आहे. तरच हा विषय लोकांपर्यंत पोहोचेल. हे असे चित्रपट असे विषय लोकांपर्यंत पोहोचलेच नाही तर निर्माता दिग्दर्शकांपासून आम्हा कलाकारांचं पण खूप नुकसान होतं. अनेक वर्षांमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले पण गर्ल चाइल्ड , महिला सशक्तिकरण या विषयावर किती चित्रपट आले असतील?” असं म्हणत पुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
