मिलिंद गवळी यांनी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. अभिनेत्री मधु कांबीकर यांच्याबरोबरही त्यांनी चार सिनेमांत एकत्र काम केले आहे. आता मधु कांबीकर यांच्या निधनानंतर मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
मधु कांबीकर यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत मिलिंद गवळी यांनी लिहिले, “याला जीवन ऐसे नाव. आपण जन्माला कधी, कुठे आणि कोणाकडे यायचं हे आपल्या हातात नसतं आणि आपलं मरण हे कधी, कुठे, केव्हा येणार हेही आपल्या हातात नसतं. असं म्हणतात की जन्म आणि मरणाच्या मधला जो काळ आहे तो आपल्या हातात असतो. पण, खरंतर तोही आपल्या हातात नसतोच. मराठीतली एक उत्तम अभिनेत्री नृत्यांगना अश्विनी एकबोटे स्टेजवर परफॉर्म करता करता तिथेच कोसळली आणि एका क्षणात तिचा प्राण सुटला.”
पुढे त्यांनी लिहिले, “परवा मराठीतल्या दिग्गज लावणी सम्राज्ञी, उत्तम अभिनेत्री मधु कांबीकर आपल्यातून निघून गेल्या. दहा वर्षांपूर्वी अशाच एका स्टेज शोमध्ये त्यांनी गिरकी घेतली आणि चक्कर येऊन त्या पडल्या. त्या कोमामध्ये गेल्या. एक दशक, दहा वर्ष त्या अंथरुणाला खिळून होत्या. परवा त्यांचा प्राण सुटला, म्हणून म्हटलं की जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं.”
“मधु कांबीकर यांच्याबरोबर काम केल्याची आठवण सांगत मिलिंद गवळी यांनी लिहिले, “मी आणि मधु कांबीकरांनी चार सिनेमे एकत्र केले. या चार सिनेमांपैकी तीन सिनेमांत त्यांनी माझ्या आईची भूमिका केली, त्यामुळे त्यांच्याकडून आईचं प्रेम आणि वात्सल्याचा अनुभव मला आला होता. मुळातच त्या खूप प्रेमळ होत्या. दिसायला अतिशय सुंदर होत्या. खूपच घरंदाज दिसायच्या. ‘काळभैरव’, ‘मैत्री जीवाची’, आणि ‘महिमा खंडोबाचा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी माझ्या ‘आई’ची भूमिका केली होती, त्यामुळे आमच्यात खूपच प्रेमळ ‘आईमुला’चं नातं निर्माण झालं होतं. त्यानंतर “दुर्गा म्हणत्यात मला” या चित्रपटांमध्ये कुलदीप पवारांबरोबर त्यांनी नकारात्मक भूमिका केली होती, तीसुद्धा त्यांनी खूपच भारी केली होती.”
एक किस्सा सांगत मिलिंद गवळी यांनी लिहिले, “एक दिवस आम्ही बारामती जवळ ‘निरा’ या गावात शूटिंग करत होतो. त्या दिवशी मधुबाईंचा वाढदिवस होता. त्यांनी आम्हाला त्यांचा वाढदिवस असल्याचं सांगितलं नव्हतं, पण निर्माते, दीपाली सय्यद आणि बाकीचे युनिटमधले आम्ही सगळ्यांनी त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं. पुण्यावरून त्यांच्या मुलाला प्रीतमला बोलावून घेतलं. त्या खूप खूश झाल्या होत्या. त्यांना इतका आनंद झाला होता की अनेक दिवस त्या दिवसाविषयी त्या बोलत असत. परवा महेश टिळेकरांनी मला फोन करून त्यांच्या जाण्याची बातमी दिली. आम्ही दोघेही मुंबईत होतो, दहा-पंधरा मिनिटांत आम्ही घर सोडलं आणि पुण्याला मधुबाईंच्या अंत्यसंस्काराला पोहोचलो. त्यांच्याविषयीच्या जुन्या आठवणी शेअर करत होतो. त्या इतक्या उत्तम नृत्यांगणा होत्या, एके दिवशी त्या नृत्य करत असताना तबल्यावर साथ देणाऱ्या तबलजीचा एक ठेका चुकला आणि मधुबाई त्यांच्यावर खूप चिडल्या. इतकी वर्ष रियाज करूनदेखील “ठेका कसा चुकतो?” असा प्रश्न त्यांनी विचारला होता”, अशी आठवण मिलिंद गवळी यांनी सांगितली.
दरम्यान, मिलिंद गवळींनी मधुजींचे फोटो, व्हिडीओ शेअर करत त्यांच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला.
