Milind Gawali on Sadashiv Amrapurkar and Satish Tare: मिलिंद गवळी हे सध्या ‘वचन दिले तू मला’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करतात. त्याबरोबरच ते त्यांच्या सिनेमातील अनेक किस्से सांगतात.

“तुमच्या कामानेच तुम्हाला पुढचं काम…”

मिलिंद गवळी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. काही फोटो शेअर करीत त्यांनी आठवणी सांगितल्या आहेत. लोकप्रिय अभिनेते सदाशिव अमरापूरकर, सतीश तारे यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत लिहिले, “तुमच्या कामानेच तुम्हाला पुढचं काम मिळतं. या क्षेत्रामध्ये कोणीही कोणावर उपकार करीत नाही. तुम्ही जर भूमिकेसाठी योग्य नसाल, तर कोणीही तुम्हाला ती भूमिका देणारच नाही आणि जर तुम्ही योग्य असाल, तर तुम्हाला कुठूनही शोधून काढून, ते काम तुम्हाला दिले जाईल.”

पुढे त्यांनी लिहिले, “मी साताऱ्यामध्ये ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या सिनेमाचे शूटिंग करीत होतो. त्या सिनेमामध्ये खलनायकाच्या भूमिकेत सदाशिव अमरापूरकर होते. त्यांच्याबरोबर माझे बरेचसे सीन्स होते. सदाशिवजी मला म्हणाले, “तू खूप छान काम करतोस. मी सिनेमा करतोय. मला तू हीरो म्हणून हवा आहेस.”

सदाशिव अमरापूर यांनी कोणत्या सिनेमात काम दिले, याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांनी लिहिले, “काही महिन्यांतच जळगावला ‘आर आर आबा आता तरी थांबा’ या चित्रपटात त्यांनी मला नायकाची भूमिका दिली. त्या सिनेमात सगळे दिग्गज कलाकार होते. त्यात सतीश तारे हा अफलातून कलाकार होता. त्याची आणि माझी खूप छान मैत्री झाली. इतका टॅलेंटेड कलाकार मी आजपर्यंत पाहिला नव्हता. त्याला अगदी देवी सरस्वतीच प्रसन्न होती. सतीश तारे हा हुशार अभिनेता होता. म्हणूनच मी सतीश तारेला घेऊन ‘मोडेन; पण वाकणार नाही’ हा मराठी सिनेमा सुरू केला होता; पण काही कारणामुळे तो सिनेमा मला करता आला नाही. नंतर सतीश तारेबरोबर मी खूप जाहिरातींत काम केले होते; पण त्याच्याबरोबर सिनेमा करायची इच्छा मात्र तशीच राहिली. आता फक्त या सगळ्या भारी आठवणी मागे राहिल्यात.”

पुढे त्यांनी लिहिले, “ही अशी प्रतिभावान माणसं आपल्यातून निघून जाताना फक्त आठवणी मागे ठेवून जातात. माझ्या या प्रवासात, मला माझ्या कामामुळे खूप कामं मिळाली आहेत. पण, अनेक चांगली माणसं कायमची निघून गेली याची खंत असते.”

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यांचे चित्रपट आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.