Pratap Sarnaik Birthday : मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक कलावंत आहेत, ज्यांची राजकीय वर्तुळातील मान्यवरांशी खूप चांगली मैत्री, ओळख आहे. मराठी लेखक-दिग्दर्शक विजू माने आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचीही अनेक वर्षांपासून एकमेकांशी चांगली ओळख आहे. आज प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक विजू माने यांनी खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, यावेळी त्यांनी एक खास किस्सा सांगितला आहे.

विजू मानेंनी एकेदिवशी प्रताप सरनाईक यांना रात्री दीड वाजता फोन करून मदत मागितली होती. मध्यरात्री फोन करूनही कुठलाही त्रागा न करता काहीच मिनिटांतच त्यांनी विजू मानेंना मदत केली. हा खास किस्सा या दिग्दर्शकाने खास पोस्ट लिहित सर्वांना सांगितला आहे. तसेच या पोस्टकडे राजकारणाच्या चष्म्याने पाहू नका, असंही विजू मानेंनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे.

विजू माने लिहितात, “कृपया या पोस्टकडे राजकारणाच्या चष्म्याने पाहू नका. आज आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस. स्ट्रगल म्हणजे काय…तर यांचं आयुष्य…आणि शून्यातून साम्राज्य उभं करणं म्हणजे काय तर यांच्या आयुष्याचा आताचा टप्पा…! मला कायम अशा व्यक्तींचं अप्रूप आणि आदर वाटत आला आहे. एक रिक्षा चालवणारा, भुर्जी पावच्या गाडीवर काम करणारा माणूस आज मोठा उद्योजक आणि राज्याचा मंत्री बनतो ही वाटचालच स्फूर्तीदायक आहे.”

“काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझी मुलगी काही महिन्यांची होती. रात्री दीड वाजता वीज गेली. ती प्रचंड आक्रोश करत रडत होती. प्रचंड उकाड्याने सगळेच त्रस्त झालो होतो. कोणाकडे मदत मागावी काही सुचेना…. आणि शेवटी आठवलं की आपल्याकडे प्रताप सरनाईक यांचा नंबर आहे. मी रात्री दीड वाजता अत्यंत बेफिकीर होत त्यांना फोन लावला. माझी मुलगी रडते आहे हे देखील सांगितलं. आश्चर्य म्हणजे त्यांनी देखील कुठलाही त्रागा न करता काहीच मिनिटांत माणसांना कामाला लावलं आणि वीज परत आली. मुलगी शांत झोपली. पण दुसऱ्या दिवशी माझं मलाच अपराधी वाटू लागलं. आपण मैत्रीचा शिक्का मारून इतक्याशा कामासाठी इतक्या मोठ्या माणसाला फोन केला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमाने लेकीची चौकशी केली. शिवाय उपस्थितांना थेट आपल्या भाषणातून किंवा खाजगी मिटिंगमध्ये आजूबाजूच्या मंत्र्यांना सांगितलं, की विजू माझा खूप जुना मित्र आहे. मैत्री जपणं आणि मैत्री खुपणं हे दोन्हीही ज्यांच्या बाबतीत होऊ शकतो असे प्रताप सरनाईक. त्यांच्या एकूण वागणुकीवरून आणि फिटनेसवरून वाटत नसलं तरी ६२ वा वाढदिवस आहे. (हे मेन्शन केल्याबद्दल ते चिडू शकतात) पण तरीही पुढची किमान १०० वर्ष त्यांना निरोगी आयुष्य लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हॅप्पीवाला बर्थडे भाऊ!” अशी पोस्ट शेअर करत विजू मानेंनी प्रताप सरनाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विजू माने यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी देखील प्रताप सरनाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.