'फ्रेशर्स', 'लाडाची मी लेक गं' या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मिताली मयेकर घराघरांत लोकप्रिय झाली. मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी झाला. अभिनेत्री तिचा आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिताली तिच्या वाढदिवसानिमित्त नवरा सिद्धार्थ चांदेकरसह दुबई फिरायला गेली आहे. दरम्यान, लाडक्या लेकीच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मितालीच्या वडिलांनी तिला खास मेसेज केला आहे. या मेसेजद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी लेकीचं कौतुक केलं आहे. हेही वाचा : Video : अभिनेत्री शिवानी सुर्वेचा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक अंदाज; व्हिडीओ शेअर करत म्हणाली… मितालीचे वडील लाडक्या लेकीसाठी लिहितात, "२७ वर्षांपूर्वी साधारण या वेळेला आम्हाला कळलं होतं की, उद्या दुपारपर्यंत आमचा बाबू आमच्या हातात असेल. कोण असेल, कसा असेल ह्याचं प्रचंड टेन्शन होतं. पण जे काही असेल कसंही असेल पण आपले बाळ असेल ह्यातच सगळा आनंद होता. पण आम्हाला दोघांनाही जे मनापासून हवं होतं तेच परमेश्वराने आम्हाला दिलं. सकाळी विषय झाला तेव्हा आई म्हणाली, २७ वर्षांपूर्वी पोटातलं जग बघत होती आता सगळ्या जगभर फिरतेय! असाच खूप खूप मोठा हो! यशस्वी हो! उद्या तुझा २७वा वाढदिवस! दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही. तुझ्याशी बोबडं बोलण्याची सवय अजूनही गेली नाही आमची! तुझ्या लहानपणीच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही दिवस जात नाही. मग तुझे ते बोबडे बोल आम्हीच एकमेकांशी बोलतो. तू मोठी झालीस पण आम्ही अजूनही त्याच जगात वावरतोय. कारण तू आमच्यासाठी अजूनही तीच आहेस तशीच आहेस. छकुली! वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा पिलू! आणि खूप खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद!" हेही वाचा : “‘त्या’ मराठी कलाकारांनी सरड्याप्रमाणे रंग बदलले”, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “एका कृतघ्न अभिनेत्रीने…” मितालीने वडिलांनी पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर अभिनेत्री लिहिते, "माझ्या बाबांनी पाठवलेल्या या मेसेजमुळे माझा संपूर्ण दिवस आनंदी झाला." दरम्यान, मिताली वाढदिवस साजरा करण्यासाठी सिद्धार्थ चांदेकरसह दुबईला गेली आहे. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर जानेवारी २०२१ मध्ये सिद्धार्थ-मितालीने थाटामाटात लग्न केलं. या दोघांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.