‘क्लासमेट’, ‘झिम्मा’, ‘ओले आले’ अशा लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणारा दमदार अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखलं जातं. त्याचा जन्म १४ जून १९९१ रोजी पुण्यात झाला. सिद्धार्थ आज त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीत यश मिळवल्यावर वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केलं. आज आपल्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीने खास पोस्ट शेअर करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली यांची जोडी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघेही कायम एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आज सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त मितालीने दोघांचे रोमँटिक फोटो शेअर करत नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात…

हेही वाचा : लग्नानंतरचे घरगुती पुष्पा अन् वल्ली! ‘अंगारो सा’ गाण्यावर सेलिब्रिटी जोडप्याचा हटके डान्स, व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले

मिताली लिहिते, “माझ्या आयुष्यातील ‘जेमिनी’ व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्याबरोबरच प्रत्येक वर्ष हे जंगल सफारीप्रमाणे आयुष्यात नवनवीन गोष्टी घेऊन येणारं असतं. प्रेम, हास्य, भयंकर विनोदी जोक्स या सगळ्या गोष्टींनी आपलं आयुष्य परिपूर्ण आहे. तू माझा सगळ्यात मोठा आधार आहेस. माझा सर्वात चांगला मित्र आहेस. तू माझ्या गोड हास्याचं कारण आहेस. तुझ्याशिवाय आयुष्य जगण्याचा मी विचार देखील करू शकत नाही.”

“प्रेम, हास्य, विविध ठिकाणी प्रवास करत आपण हे अविस्मरणीय क्षण असेच एकत्र जगूया… वर्षानुवर्षे असंच राहुया आणि असेच असंख्य वाढदिवस एकत्र साजरे करूया! विथ ऑल माय लव्ह” असं कॅप्शन देत मितालीने सिद्धार्थसाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : मित्रांचे अनुत्तरीत फोन, डोक्याला जखमा अन्…; चित्रपट रिलीजच्या आदल्या दिवशी संशयास्पद अवस्थेत आढळला अभिनेता प्रदीप विजयनचा मृतदेह

बायकोच्या पोस्टवर धमाल कमेंट करत सिद्धार्थने तिचे आभार मानले आहेत. “जेमिनी असेल घरी, तर हॅपिनेसची चिंता डोन्ट वरी! लव्ह यू माँक” असं अभिनेत्याने कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सिद्धार्थचे गेल्या काही महिन्यांमध्ये ‘झिम्मा २’, ‘ओले आले’ आणि ‘श्रीदेवी प्रसन्न’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता लवकरच प्रेक्षक त्याला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.