झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतीक्षित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकतंच ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाचा टीझर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने होते. “जेव्हा सह्याद्रीला कणा नव्हता, मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव,” असा डायलॉग यात पाहायला मिळत आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढवली आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
आणखी वाचा : मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कारस्थान अन् उद्धवस्त झालेले कुटुंब, ‘चाणक्य’ चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा

या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. यंदा याआधी कधीच न झालेला असा प्रयोग ‘हर हर महादेव’ या चित्रपटाद्वारे करण्यात येणार आहे. हा चित्रपट फक्त मराठीतच नाही तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे. यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सकारात्मकतेची, शौर्याची, देश प्रेमाची ज्योत पेटवणार का, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray voiceover har har mahadev movie teaser release on 25th october nrp
First published on: 05-10-2022 at 15:23 IST