Abhijit Panse Share Video Of Ink Scandal : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज (१५ जानेवारी) सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, मतदानाच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये बोटावर लावली जाणारी शाई सहजपणे पुसली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक नागरिकांनी याचे व्हिडीओ शेअर केले आहेत, अशातच आता मनसे नेते आणि मराठी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीसुद्धा याचा पुरावा दाखवलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई (मार्कर) सॅनिटायझरने सहज पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशातच दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीसुद्धा याचा स्पष्ट खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत त्यांनी बोटावरची शाई अगदी सहज जात असल्याचं दाखवलं आहे. ‘लोक शाई’ अशी कॅप्शनसुद्धा त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत ते म्हणतात, “गेल्या काही निवडणुकांत दुबार मतदान, बोगस मतदान असे काही प्रकार झाले. आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे. मतदानानंतर बोटावर शाई लावली जाते, ती आता शाई नसून छोट्याश्या मार्करनं खूण केली जातेय. जी अगदी सहज निघतेय.”
यानंतर अभिजीत पानसे यांनी हातावरची शाई नेलपेंट रिमुव्हरनं अगदी सहज निघून जात असल्याचं दाखवलं. अभिजीत पानसे या व्हिडीओमध्ये पत्नीच्या बोटावरची शाईसुद्धा पुसून दाखवतात. मग ते स्वत:च्या हातावरची शाईसुद्धा पुसतात. या व्हिडीओत त्यांच्या हातावरची शाईसुद्धा अगदी सहज निघून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
अभिजीत पानसेंनी १० सेकंदांत पुसली बोटावरची शाई
व्हिडीओमध्ये पुढे अभिजीत पानसे म्हणतात, “माझ्या मुलीच्या पर्समध्ये नेलपेंट रिमुव्हर होतं ते काढलं आणि त्याने शाई जातेय का ते पाहिलं. तर ही शाई १० सेकंदांत निघतेय. मला अनेक ठिकाणाहून याबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. नेलपेंट रिमुव्हर सोडून द्या, साध्या पाण्यानेसुद्धा ही मार्करची ही शाई निघून जात आहे. याला नेमकं काय म्हणायचं? मतदान करताना जी शाई लावायचे, त्याऐवजी मार्कर लावून सत्ताधाऱ्यांना नेमकं काय साधायचं आहे किंवा मतदानात काय फेरफार करायची आहे. मला माहीत नाही, ही लोकशाही नव्हे तर लोकशाई आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे.”
दरम्यान, याप्रकरणी बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
